बाघाच्या बावरीची ‘तारक मेहता…’मधून एक्झिट


गेल्या दशकभरापासून लोकांचे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मनोरंजन करीत आहे. ही मालिका छोट्या मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींच्या पसंतीमुळे टीआरपीमध्ये सुद्धा अव्वल आहे. पण, या मालिकेतील काही कलाकार गेल्या काही दिवसांपासून बाहेर पडत आहेत. सर्वप्रथम टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीने ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेतून नीधी भानुशाली बाहेर पडली. त्याचबरोबर खूप दिवसांपासून मालिकेतून ‘दयाबेन’ ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी बेपत्ता आहे. या मालिकेला आता पुन्हा एकदा एक झटका बसला आहे.


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरिया बाहेर पडली आहे. तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय कमी मानधन मिळत असल्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. तिने मालिका निर्मात्यांकडे मानधन वाढवून देण्याची मागणी केली होती. पण, तिची मागणी मान्य न झाल्यामुळे या मालिकेतून बाहेर पडण्याचा अखेर तिने निर्णय घेतला आहे. तिने स्वतःच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शोच्या प्रवासाबद्दल सांगताना मोनिका म्हणाली की, या मालिकेतील शो आणि पात्र निश्चितपणे माझ्या खूप जवळचे आहेत. मला चांगले मानधन मिळावे अशी माझी मागणी होती. पण, ती पूर्ण न झाल्यामुळे मी या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. जर मला माझे मानधन वाढवून मिळत असेल तर मला पुन्हा या मालिकेत काम करायला आवडेल, असेही ती म्हणाले.


गेल्या सहा वर्षापासून मोनिका ही मालिकेत काम करत आहे. या मालिकेतला अखेरचा एपिसोड मोनिकाने २० ऑक्टोबर रोजी शूट केला होता. या मालिकेतील मोनिकाची भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. तिचे ते वाजवी बोलणे, आणि ‘हाय-हाय गलती से मिस्टेक हो गई’ हे लोकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहे. तसेच जेठालालचे नवीन नाव ठेवणे, जेठालालला त्रास देणे लोकांना आवडते. बावरी आणि बाघा यांच्या रोमांसचीही चांगलीच चर्चा होत असते. मोनिकाच्या जागी कोणत्या अभिनेत्रीला आणले जाते किंवा मोनिकाला मानधन वाढवून तिला परत मालिकेत घेतले जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment