संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नियुक्ती


नवी दिल्लीः संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना स्थान देण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी साध्वींची नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या कमिटीचे नेतृत्त्व करीत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव करीत भोपाळमधून सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

एकूण २१ सदस्य संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत असून आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे. भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून त्या चर्चेत आहेत. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर जादूटोणा केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Leave a Comment