तामिळनाडूच्या हितासाठी आपण रजनीकांत यांच्यासोबत – कमल हसन


चेन्नई – तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांबाबत रजनीकांत यांनी केलेले वक्तव्य ही टीका नसून सत्यपरिस्थिती असल्याचे म्हणत मक्कल नीधी मय्यम (एमएनएम) या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि अभिनेते कमल हसन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांची पाठराखण केली आहे.

हसन पुढे म्हणाले, की आपण तामिळनाडूच्या हितासाठी रजनीकांतसोबत आहोत. पण राजकीयदृष्ट्या एकत्र येणे आहे की नाही याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. आपल्याला तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद मिळेल असे पलानीस्वामींना स्वप्नातदेखील वाटले नसेल, त्यांची झालेली प्रगती हे एक आश्चर्य असल्याचे रजनीकांत यांनी म्हटले होते. अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी यावर प्रचंड रोष व्यक्त केला होता. कमल हसन यांना याबाबत त्यांचे मत विचारले असता, ही सत्यपरिस्थिती असल्याचे म्हणत रजनीकांतची त्यांनी पाठराखण केली.

आपण राजकीय पक्ष स्थापन करणार असून, पुढील विधानसभा निवडणूका लढवण्याचे रजनीकांत यांनी आधीच संकेत दिले आहेत. तर, कमल हसन यांचा एमएनएम हा राजकीय पक्ष देखील स्थापन झाला असल्यामुळे तमिळनाडूच्या हितासाठी हे दोघे एकत्र येणार म्हणजे, राजकीय युती करणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. याबाबत विचारले असता, आम्ही एकत्र येणे ही काही नवी बाब नाही, गेली ४४ वर्षे आम्ही एकत्रच असल्याचे म्हणत हसन यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. ते चित्रपट क्षेत्रात एकत्र असण्याबाबत बोलत होते. अपूर्व रागंगल (१९७५) या चित्रपटातून रजनीकांत यांनी तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. कमल हसन यांनीही त्यांच्या या पहिल्याच चित्रपटात भूमिका केली होती.

Leave a Comment