१ डिसेंबरपासून महागणार व्होडाफोन आयडियाची सेवा


नवी दिल्ली – व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मोबाईल सेवांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय आर्थिक ताळेबंदावर ताण आलेल्या व्होडाफोन आयडियाने घेतला. कंपनी हे दर १ डिसेंबरपासून वाढविणार आहे.

खात्रीशीर जागतिक दर्जाच्या डिजीटलचा अनुभव ग्राहकांनी घ्यावा, यासाठी दर वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे व्होडाफोन आयडियाने म्हटले आहे. प्रस्तावित दरवाढ नेमकी किती असेल, हे अद्याप कंपनीने जाहीर केलेले नाही. व्होडाफोनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोट्यवधी रुपये केंद्र सरकारला द्यावे लागणार असल्यामुळे दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडियाला ५० हजार ९२१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

सरकारच्या दिलासादायक निर्णयावर कंपनी व्यवसायात राहणे हे अवलंबून असेल, असेही व्होडाफोन आयडियाने म्हटले. मोठा आर्थिक ताण दूरसंचार क्षेत्रावर आला आहे. याबाबत सचिवांची उच्चस्तरीय समिती दिलासा देण्यावर विचार करत असल्याचे व्होडाफोन आयडियाने म्हटले आहे. व्होडाफोन आयडियाचे देशात ३ कोटी ग्राहक आहेत.

दरम्यान इतर दूरसंचार ऑपरेटरच्या क्रमांकावर जिओच्या ग्राहकांनी कॉल केल्यास ६ पैसे प्रति मिनिट आकारण्यात येतात. रिलायन्सने हे दर ऑक्टोबरमध्ये लागू केले आहेत. मोफत कॉलिंगची सेवा देत दूरसंचार क्षेत्रात वर्चस्व निर्माण केलेल्या जिओने पहिल्यांदाच कॉलिंगसाठी दर लागू केले.

Leave a Comment