समज – गैरसमज


आजकालच्या जगामध्ये काही गोष्टींचे किंवा घटनांचे ज्ञान हे आपल्याला सांगोवांगीच आलेले असते, आणि त्याबद्दल मनामध्ये कुठीलीही शंका न येऊन आपणही ते ज्ञान ‘ सर्वमान्य’ म्हणून स्वीराकारलेले असते. त्या ज्ञानाच्या मागचे किंवा घटनेमागचे तथ्य किंवा खरेपणा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण क्वचितच करतो. अश्याच या काही गोष्टी, ज्या आपण “ हे असेच झाले असले पाहिजे “, असे म्हणून स्वीकारल्या खऱ्या, पण त्यामागचे तथ्य मात्र वेगळेच असते.

पुष्कळ लोकांना घरामध्ये पाळीव प्राणी ठेवण्याची हौस असते. कुत्री, मांजरी, पोपट असे प्राणी हौशी लोक घरात ठेवतात. काही जणे ससेही पाळतात. सश्यांना गाजर खावयास आवडते असा समज आहे. पण ही समजूत चुकीची आहे. गाजरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे ससे आजारी होऊ शकतात. गाजर खायला घातल्यामुळे सशांचे दात खराब होऊन त्यांच्या पचनक्रियेतही अडथळे निर्माण होऊ शकतात. सशाचे खाणे गवत हेच आहे. त्याचबरोबर पालेभाज्या, ब्रोकोली हे ही खाद्य सशांना द्यावे.

मार्शल आर्ट्स मधील ब्लॅक बेल्ट हा त्या युद्धकलेमध्ये निपुण असणाऱ्याचे प्रतीक आहे ही गोष्ट जरी खरी असली, तरी याचा अर्थ, तो खेळाडू मार्शल आर्ट्स मध्ये निष्णात असेल असा मात्र नाही. मार्शल आर्ट्स मधील विविध रंगांचे बेल्ट, त्या विशिष्ट मार्शल आर्टच्या प्रत्येक पायरीतील नैपुण्य दर्शवितात. विविध रंगांचे बेल्ट देण्याची पद्धत जपान मधील जीगोरो कानो या ज्युडो च्या जनकाने सुरु केली. ज्युडो हे मार्शल आर्ट आता जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. पण ब्लॅक बेल्ट मिळणे हा ज्युडोचा अंतिम टप्पा आहे असा सर्वसामान्यांचा गैरसमज आहे. पण वास्तवात, हा बेल्ट धारण करणाऱ्याचे त्या मार्शल आर्ट बद्दलचे ज्ञान सखोल असून, त्याला या खेळाच्या प्राथमिक तंत्रांमध्ये नैपुण्य प्राप्त आहे, असा आहे. पण त्यापुढेही जाऊन या युद्धकलेच्या अनेक पायऱ्या आहेत. जसजसा एखादा खेळाडू या मध्ये निपुण होत जातो, तसतसे त्याच्या ब्लॅक बेल्टवर स्ट्राईप्स ( पट्ट्या ) दिल्या जातात.

आपल्याला श्वास घेण्यासाठी जो ऑक्सिजन लागतो तो केवळ झाडांपासून आपल्याला मिळतो ही समजूत चुकीची आहे. आपण श्वास घेतना वापरत असलेला ७० टक्के ऑक्सिजन हा महासागरांमधील फायटोप्लँकटन मधून मिळत असतो. शाळेमध्ये जीवशास्त्र शिकताना आपल्याला शिकविले जाते की झाडे कार्बन डाय ऑक्साईड घेऊन, ऑक्सिजन देतात, आणि त्यामुळे झाडे हेच ऑक्सिजन चे प्रमुख स्रोत आहे असे आपण समजतो. पण असे नसून ७० टक्के ऑक्सिजन आपल्याला महासागरांमध्ये असलेल्या फायटोप्लँकटन मधून मिळतो. ही समुद्रामध्ये आढळणारी एकपेशीय वनस्पती आहे.

इजिप्त येथील जगप्रसिद्ध पिरॅमिड हे गुलामांकरवी बांधविले गेले असा समज आहे. पण ही समजूत चुकीची आहे. पण पिरॅमिड जवळ जे काही अवशेष सापडले, त्यांवरून हे निश्चित झाले की तिथे वसलेले कामगार गुलाम नसून, त्यांचे राहणीमान चांगल्या दर्जाचे होते. तसेच त्यांच्यापैकी कोणाचे निधन झाल्यास त्याला सन्मानाने दफन केले गेल्याचेही पुरावे सापडले आहेत. गुलामांना असे मान मरातब दिले जात नसत, त्यामुळे इथे राहणारे कारागीर हे आर्थिक दृष्ट्या संपन्न होते असे सांगितले जाते.

Leave a Comment