चंद्रकांत पाटील यांच्याबाबत संजय काकडेंचे खळबळजनक वक्तव्य


पुणे – भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडुण आलेले आमदार चंद्रकांत पाटील हे पक्षाने दिल्लीहून लादलेले उमेदवार असल्याचे म्हटले आहे.

भाजपने पुणे शहराच्या महापौर पदासाठी नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. महापौर पदासाठी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्याने उमेदवारीचे समर्थन करताना भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी दिल्लीहून पक्षाने उमेदवार लादल्‍याने कोथरूडमध्ये इच्छुक असलेले मोहोळ नाराज असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. आता महापौरपद देऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर केली असल्याचेही काकडे म्हणाले.

सोमवारी मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय काकडे बोलत होते. काकडे यांनी यावेळी राज्यात कुठल्याही परिस्थितीत पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा दावा देखील केला. राज्यात 2 प्रादेशिक पक्ष एकत्र येणे शक्य नाही. या 3 पक्षाच्या आघाडीत खोडा पडणारच आणि हे चित्र 8 दिवसात स्पष्ट होऊन भाजपचे सरकार येईल. देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा देखील काकडे यांनी केला.

Leave a Comment