सत्तास्थापनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा नाही – शरद पवार


नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा गुंता निवडणूक निकालाच्या २५ दिवसांनंतरही सुटू शकलेला नाही. साेमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांच्यात चर्चेनंतर शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार स्थापनेच्या निर्णयावर शिक्कामाेर्तब हाेईल, अशी आशा हाेती. पण दाेन्ही नेत्यांनी त्यावरही पाणी फेरले.

साेमवारी शरद पवार संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत दाखल झाले. सकाळीच त्यांना पत्रकारांनी घेरले व महाराष्ट्रात सत्तास्थापना कधी हाेणार? अशा प्रश्नांचा भडिमार केला. पवारांनीही त्यावर भाजप-शिवसेनेला हा प्रश्न विचारा असे मिश्किलपणे सांगत पत्रकारांचीच विकेट घेतली. पण पवारांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात हाेते. पवारांनी सायंकाळी साेनिया गांधींच्या घरी जाऊन त्यांच्याशी ४५ मिनिटे चर्चा केली.

पवार बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना म्हणाले, साेनियांना मी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. पण आमची सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही. याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते चर्चा करून आम्हाला कळवतील. आघाडीतील इतर मित्रपक्षांना नाराज न करता त्यांची मतेही विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

Leave a Comment