शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ


नवी दिल्ली – आज (सोमवारी) ज्येष्ठ न्यायाधीश शरद बोबडे यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. त्यांनी यासोबतच देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्र स्वीकारली. राष्ट्रपती भवनात सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता आयोजित समारंभात न्या. बोबडे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली.

देशातील विविध ऐतिहासिक निर्णयांमध्ये न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची अयोध्या निकाल प्रक्रियेमध्येही अतिशय महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांची सरन्याधीशपदाची कारकीर्द ही १७ महिन्यांची राहणार आहे. सरन्यायाधीश पदावरून ते २३ एप्रिल २०२१ ला निवृत्त होतील. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे रविवारी १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांनी न्यायाधीश शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात यावी. यासाठी कायदे मंत्रालयाला पत्र लिहून शिफारस केली होती. न्या. बीपी गजेंद्र गडकर, न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदाचा मान तिसऱ्यांदा महाराष्ट्राला मिळणार आहे.

नागपूर येथे २४ एप्रिल १९५६ रोजी वकील कुटुंबात न्या. बोबडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अरविंद बोबडे यांनी महाराष्ट्राचे अ‌ॅडव्होकेट जनरल पद भूषवले आहे. नागपूर विद्यापीठातून न्या. बोबडे यांनी कायद्याची पदवी घेतली. ते १९७८ साली महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य बनले आणि त्यांची १९९८ मध्ये वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांची १९९८ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदी निवड करण्यात आली

त्यानंतर, त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी १२ एप्रिल २०१३ ला नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अर्जन कुमार सिकरी यांचाही शपथविधी पार पडला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणूनही मार्च २००० मध्ये त्यांची निवड झाली. त्यानंतर, १६ ऑक्टोबर २०१२ साली ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. २०१६ साली नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. यासोबतच नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असणारे बोबडे हे नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती झाले. सध्या रंजन गोगोई यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात बोबडे हे सर्वात ज्येष्ठ आहेत.

Leave a Comment