दिल्लीत झळकले भाजप खासदार गौतम गंभीर गायब असल्याचे पोस्टर


नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून सर्वसामान्यांचा श्वास दिल्लीतील हवेने घुसमटू लागला आहे. भाजप यासाठी सत्ताधारी आप सरकारला जबाबदार धरत आहे. तर, यासाठी ‘आप’ने भाजपवर हल्ला चढवला आहे. ‘आप’ने शुक्रवारी माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीरला धारेवर धरले आहे.


गौतम गंभीर गायब असल्याची पोस्टर्स भिंतीवर लागली असल्याचे जंगपुरा येथील आपचे आमदार प्रवीण कुमार यांनी ट्विट करत म्हटले आहे. प्रदूषणाने जनता त्रासली आहे. पण ‘गंभीरता’ सोडून देऊन आमचे खासदार इंदूरमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री करत आहेत. सोशल मीडियावर आपच्या आमदाराच्या या ट्विटला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

शुक्रवारी संसदेच्या स्थायी समितीची वाढत्या प्रदूषणावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली होती. अनेक खासदार यामध्ये अनुपस्थित राहिले. यामध्ये पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांचाही समावेश आहे. यावरून आम आदमी पक्षाने त्याच्यावर जोरदार हल्ला केला आहे. सोशल मीडियावर गंभीरला ट्रोल केले जात आहे.

Leave a Comment