अजय देवगणने शेअर केला ‘तानाजी’चा टीझर


आजवर ऐतिहासिक चित्रपटांना बॉलिवूडमध्ये विशेष पसंती मिळाली असल्यामुळेच बरेचसे ऐतिहासिक चित्रपट आत्तापर्यंत तुमच्या भेटीला आले आहेत. त्यातच आता अभिनेता अजय देवगणचा आगामी बहुचर्चित ‘तानाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक रिलीज केल्यानंतर आता या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे.


या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा झळकणार आहे. त्यांनी ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे’, असे म्हणत आपल्या प्राणाची बाजी लावून कोंढाणा गड राखला. तानाजी चित्रपटात त्यांच्या शौर्याची हीच गाथा उलगडणार आहे.

तानाजींच्या भूमिकेत अजय देवगण दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यापूर्वी एक १२ सेकंदांचा टीझर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. स्वराज्यापेक्षा प्रिय काहीच नाही, असे या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच पाहायला मिळते. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता शरद केळकर साकारत आहे. अजय देवगणसोबत काजोल, सैफ अली खान आणि पंकज त्रिपाठीचीही या चित्रपटात भूमिका आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० ला रिलीज होणार आहे.

Leave a Comment