बिल गेट्स यांच्या हस्ते होणार डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा सन्मान


नवी दिल्ली – लाईफटाईम अचिव्हमेंट पदकाने डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना गौरवान्वित करण्यात येणार आहे. डॉ. प्रकाश आमटे यांचा गौरव बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते केला जाणार आहे. उद्या (रविवार)हा कार्यक्रम नवी दिल्लीत पार पडेल.

आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव करण्यात येणार आहे. बिल गेट्स यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील आयसीएमआर हॉल येथे उद्या संध्याकाळी हा सोहळा पार पडणार आहे.

यापूर्वी मॅगेसेसे पुरस्कारानेही आमटे दाम्पत्याला सन्मानित करण्यात आले. प्रकाश आमटे गडचिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहेत. डॉ. प्रकाश आमटे यांना त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट) पदवीने गौरवान्वित केले होते. प्रकाश आमटे गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या दुर्गम भागात जाऊन आदिवासी जनतेची सेवा करत आहेत. त्याचबरोबर दुर्लक्षित घटकांना वैद्यकीय सुविधा देऊन आरोग्य विषयक विकास साधने, शिक्षण प्राणी, अनाथालय आदी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले असून त्यासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केले आहे.

Leave a Comment