शिया वक्फ बोर्ड अध्यक्षांकडून राम मंदिर निर्मितीसाठी देणगी


लखनौ – गुरूवारी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी ५१ हजार रूपयांची देणगी जाहीर केली. याबाबत रिझवी यांनी सांगितले की, मंदिर उभारणीच्यादृष्टीने बोर्ड सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अनेक दशके चाललेल्या या खटल्यावर अखेरीस निकाल आला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. भारतात आता रामजन्मभूमीवर जगातील सर्वात सुंदर मंदिर उभारण्याचे कार्य सुरू होत आहे.

रिझवी पुढे म्हणाले की, आपल्या सर्वांचेच भगवान राम पूर्वज आहेत, म्हणूनच ५१ हजार रूपयांची भेट रिझवी फिल्मच्यावतीने रामजन्मभूमी न्यासकडे मंदिर उभारणीसाठी देत आहोत. शिया वक्फ बोर्डाच्यावतीने भविष्यात राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर त्यात देखील मदत केली जाईल, संपूर्ण जगभरासह भारतातील राम भक्तांसाठी अयोध्येतील राम मंदिर गर्वाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर ऐतिहासिक निकाल दिला आहे. राम मंदिर अयोध्येतील वादग्रस्त जागेवर बांधण्यात यावे, तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला आहे.

Leave a Comment