शरद पवारांनी नागपुरात आळवला ‘मी पुन्हा येईन’ राग


नागपूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नागपुरातील थेट शेताच्या बांधावर पोहचले असून त्यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘मी पुन्हा येईन’वरून टोला लगावला. सध्या तरी माझ्या डोक्यात ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ एवढेच असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सध्या विदर्भ दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे असून, आजचा दुसरा दिवस आहे. त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशीही शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात चर्चा केली. शेतकऱ्यांच्या पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी जास्त आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांना केंद्राकडून भांडवल उभारणीसाठी मदत व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यांनी यावेळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. भाजप नेते राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल असे म्हणत आहेत, त्यावर तुम्ही काय सांगाल, असे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. त्यावर माझ्या डोक्यात सध्या मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन एवढेच असल्याचे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तीन पक्षांचे सरकार राज्यात चालू शकत नसल्यामुळे पुन्हा आपलेच सरकार येईल. हे सरकार स्थापन झालेच तरी, सहा महिने टिकणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. शरद पवारांना त्याबाबत विचारले असता, जेवढी माहिती फडणवीसांविषयी आहे, त्यात ते ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक आहेत हे माहीत नसल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.

Leave a Comment