एवढे झाले शिवसेना आमदारांचे 6 दिवसांचे हॉटेल रिट्रीटचे बिल


मुंबई: भाजप-शिवसेनेची निवडणुकीवेळी असलेली युती निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन निर्माण झालेल्या वादामुळे तुटली आहे. राज्यात त्यानंतर सत्तास्थापनेसाठीच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आणि त्यातच आता नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत. याचाच एक भाग म्हणून आपल्या आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून शिवसेनेने कमालीची काळजी घेतल्याचेही पाहायला मिळाले. आपल्या 56 आमदारांना या काळात शिवसेनेने मुंबईतच थांबण्याचे आदेश दिले. मुंबईत त्यांच्यासाठी राहण्याची खास सोयही करण्यात आली. याच खर्चाचा तपशील आता समोर आला आहे.

सुरुवातील मुंबईतीला रंगशारदा हॉटेलमध्ये शिवसेनेने आपल्या आमदारांना ठेवले. पण, तेथे काही गैरसोय होत असल्याचे म्हणत 8 नोव्हेंबरला या आमदारांना मालाड येथील द रिट्रीट हॉटेलमध्ये हलवण्यात आले. हॉटेल रिट्रीटमध्ये या आमदारांसाठी तब्बल 80 रुम बुक करण्यात आल्या होत्या. त्यात शिवसेनेचे 56 आणि इतर 5-6 अपक्ष आमदारांची व्यवस्था करण्यात आली होती.

या ठिकाणी शिवसेना आमदारांसह समर्थक अपक्ष आमदार जवळपास 5 दिवस मुक्कामी होते. या आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 13 नोव्हेंबरला आपआपल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले. त्याआधी 12 नोव्हेंबरला स्वतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. शिवसेना आमदारांना भेटण्यासाठी ते आले होते. त्यांना देखील स्वतंत्र रुम बुक न करता आधीच्या 80 रुमपैकीच एक रुम देण्यात आली.

हॉटेल रिट्रीटमधील एका रुमसाठी प्रतिदिवस कमीत कमी 3 हजार 500 रुपयांपेक्षा अधिकच भाडे आहे. या प्रमाणे एकूण 80 रुमचे 6 दिवसांचे भाडे 14 लाख रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे आमदार फोडाफोडापासून वाचण्यासाठी शिवसेनेने आपल्या आमदारांसाठी लाखो रुपये खर्च केल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment