‘हा’ फोटो शेअर करुन ट्रोल झाली वाणी कपूर


बॉलिवूडमध्ये शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटाद्वारे सुशांत सिंह राजपूत सोबत पदार्पण करणारी अभिनेत्री वाणी कपूर उत्तम अभिनय आणि हॉटनेसमुळे कायम चर्चेत असते. तिचा नुकत्याच रिलीज झालेल्या वॉर चित्रपटातील हॉट लूक प्रचंड चर्चेत आला होता. ती अनेक वेळा आपले असेच बोल्ड आणि कूल लूक इन्स्टाग्रामवरही शेअर करत असते. पण यावेळी शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला ट्रोल केले जात आहे. त्याचबरोबर तिला काही नेटकऱ्यांनी धर्माचा आदर करण्याचा असा सल्लाही दिला आहे.


नुकताच इन्स्टाग्रामवर वाणीने आपला नव्या लूकमधील एक फोटो शेअर केला आहे. पण तिने जे कपडे या फोटोमध्ये घातले आहेत, त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. ‘हे राम’ या नावाची प्रिंट वाणीने घातलेल्या कपड्यांवर आहे. वाणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तंग कपडे परिधान केले असून ‘हे राम’ नावाची प्रिंट त्यावर आहे. तिचे हे कपडे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तिला अनेकांनी ट्रोलदेखील केले आहे.

एका नेटकऱ्याने थोडी तरी लाज बाळग श्री रामांचे नाव लिहिलेले कपडे घातले असल्याचे म्हटलं आहे. तर, मी तुमच्या कोणत्याच फोटोवर आजपर्यंत कोणतीही कमेंट केली नाही किंवा आजही मी तुम्हाला ट्रोल करत नाही. पण मॅडम कृपया असे कपडे घालून आपल्याच धर्माची चेष्टा करु नका, असे एका अन्य युजरने म्हटले आहे. तर काहींनी नाव रामाचे पण काम मात्र रावणाचे, असेही म्हटले आहे. तर, जे काही कपडे तू परिधान केले आहेस त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो, असेही एकाने म्हटले आहे.

Leave a Comment