आयुष्मानच्या ‘बाला’चे बॉक्स ऑफिसवर अर्धशतक


मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत ५० कोटी रुपयांचा आकडा पार केल्यामुळे आयुष्मान हा ‘बॉक्स ऑफिसचा किंग’ ठरत असल्याचे नक्कीच म्हणावे लागले. आयुष्मानने आतापर्यंत ‘अंधाधून’, ‘आर्टिकल १५’, ‘ड्रीम गर्ल’ आणि आता रिलीज झालेला ‘बाला’ असे सलग हिट चित्रपट दिले आहेत.

‘बाला’चे दिग्दर्शन ‘स्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी केले असून चार दिवसांत या चित्रपटाने ५२.२१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘बाला’या चित्रपटात शाळकरी वयापासून केस उडवत हिरोप्रमाणेच टेचात वावरलेल्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते, हे दाखवण्यात आले आहे.

चित्रपटाची मांडणी बाला नामक तरुणाच्या गोष्टीतून करत असताना अचानक आलेल्या या न्यूनत्वातून जाणाऱ्या माणसाची कथा-व्यथा मांडून दिग्दर्शक शांत बसलेला नाही. दिग्दर्शकाने यात एकूणच आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा घटनांचे टिक टॉक करत करत लाइक्समागे पळणाऱ्या तरुणाईची मानसिकता अचूक पकडल्यामुळेच हा चित्रपट केवळ अचानक टक्कल पडलेल्या तरुणाच्या गोष्टीपुरता मर्यादित राहत नाही. तो अनेक विषयांना स्पर्श करत पुढे जातो. म्हणूनच हा चित्रपट तरुणाईला आकर्षित करत आहे.

Leave a Comment