खासगी तेजसने पहिल्याच महिन्यात कमावला ७० लाखांचा नफा


नवी दिल्ली – पहिल्याच महिन्यात आयआरसीटीसीची पहिली खासगी रेल्वे असलेल्या तेजस एक्सप्रेसने दमदार कामगिरी केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये सुमारे ७० लाख रुपयांचा नफा तेजसने कमावला आहे. यामध्ये ३.७० कोटी रुपये हे तिकीट विक्रीतून मिळविले आहेत.

लखनौ-दिल्लीदरम्यान तेजस एक्सप्रेसची भारतीय खाद्यपान आणि पर्यटन महामंडळाकडून (आयआरसीटीसी) रेल्वे सेवा सुरू आहे. ही ५ ऑक्टोबरपासून साधारणत: ८० ते ८५ टक्के या रेल्वेमधील आसने भरलेली असल्याचे सूत्राने सांगितले. ५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २१ दिवस तेजस ही धावली आहे. आयआरसीटीसीचा या कालावधीत रेल्वेवर एकूण ३ कोटी रुपये खर्च झाला आहे. तेजसच्या सेवेवर भारतीय रेल्वेची कंपनी असलेल्या आयआरसीटीसीचे दररोज सुमारे १४ लाख रुपये खर्च झाले आहेत. तर तिकीट विक्रीतून आयआरसीटीसीला दररोज १७.५० लाख रुपये मिळाले आहेत.

तेजस ही रेल्वेकडून पहिल्यांदाच खासगी पद्धतीने रेल्वे लखनौ-दिल्ली मार्गावर सुरू करण्यात आलेली आहे. आयआरसीटीसीकडून प्रवाशांना जेवण, २५ लाख रुपयापर्यंतचा विमा व उशीर झाल्यास मोबदला अशा सुविधा देण्यात येत आहेत. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. यामध्ये सचिवांच्या गटाचाही समावेश आहे. या टास्क फोर्सकडून खासगी रेल्वे सेवा आणि रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अपेक्षित आहे. अद्याप, टास्क फोर्सची पहिली बैठकही पार पडलेली नाही.

Leave a Comment