बहुगुणी बदाम


जेव्हा पौष्टिक अन्नाचा विषय समोर येतो तेव्हा आपण सुका मेवा विचारात घेत नाही. मात्र सुक्या मेव्यातील बदाम हा दुर्लक्षित करण्यासारखा नाही. प्रत्येकाच्या घरी कमी जास्त प्रमाणात उपलब्ध असलेले बदाम हे किती गुणकारी असतात याची बहुतेकांना कल्पना नाही. आयुर्वेद, युनानी आणि सिध्द शास्त्रानुसार बदाम हा सुका मेवा दृष्टी सुधारण्यासाठी सर्वाधिक गुणकारी आहे. भूक मंदावणे, मासिक पाळीतील त्रास, मलावरोध त्याचबरोबर अर्धांगवायू आणि पाल्सी या विकारांवर आयुर्वेद हा जालीम उपाय आहे. ही तीन वैद्यकीय शास्त्रे निरनिराळी आहेत परंतु या तिन्हीमध्ये बदामाची उपयुक्तता मात्र समानतेने वर्णिली आहे. ट्रान्स डिसिप्लीनरी युनिव्हर्सिटी या विद्यापीठात संशोधन करणारे डॉक्टर पद्म व्यंकट सुब्रमण्यम आणि डॉ. सुब्रमण्य कुमार या दोघांनी बदामावर सविस्तर संशोधन केलेले आहे.

त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष मोठे उत्तेजक आहेत. आयुर्वेद आणि युनानी उपचार पध्दतीमध्ये बदामांमुळे पुरुषांतील प्रजनन क्षमता वाढते, असे म्हटलेले आहे. त्याशिवाय पुरुषांमध्ये कमी होत चाललेली लैंगिक भूक वाढवण्याचीही क्षमता बदामामध्ये असते. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर आणि लैंगिक भुकेवर आजच्या काळात गंभीर परिणाम झालेला आहे. त्यामुळे आजतरी बदामाची गरज जाणवत आहे. आयुर्वेदाने बदाम मधूमेहाच्या रुग्णांना होणार्‍या त्रासावर बदाम उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. बदामाचा याबाबतीत होणारा उपयोग हा जादुई असतो असते आयुर्वेदाचे म्हणणे आहे. माणसाच्या शरीराला बदाम शक्तीवर्धक आणि बलवर्धक असल्याचे आयुर्वेद मानतो.

सिध्द उपचार पध्दतीमध्ये बदाम शरीरातील उष्णता कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो असे म्हटले आहे. त्याशिवाय या उपचार पध्दतीने बदामाला बहुगुणी उपयोगाचा म्हटले आहे. युनानी पध्दतीमध्ये माणसाच्या मेंदूमध्ये होणार्‍या बिघाडामुळे उद्भवणारे विकार बदाम खाल्ल्याने आटोक्यात राहतात असे प्रतिपादन केलेले आहे. महिलांना मासिक पाळीच्या काळात होणारे अतिरिक्त रक्तस्रावाचे त्रासही बदामामुळे कमी होतात. माणसाची बुध्दीमत्ता नित्य बदाम खाल्ल्याने वाढते. त्याचबरोबर आतड्याची अन्नपचन करण्याची क्षमताही बदामामुळे वाढते, असे म्हटलेले आहे. युनानी उपचार पध्दतीने बदामाचे इतरही अनेक उपयोग सांगितलेले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment