घानामध्ये जल्लोषात दिला जातो मृत व्यक्तीला निरोप


आपल्याला आपली एखादी जवळची व्यक्ती गेली की होणारे दु:ख हे शब्दांत न सांगता येत नाही. त्या व्यक्तीला अंतिम निरोप देताना आपले हृदय भरुन येते. ही व्यक्ती आपल्याला भविष्यात कधीच दिसणार नाही याची सल आपल्या मनाला सारखी बोचत राहते. पण आपल्या जवळच्या व्यक्तीला कधी हसत खेळत, नाच गाण्यांच्या जल्लोषात शेवटाचा निरोप देताना तुम्ही कधी पहिले आहेत का? पण घानामधील लोक एखादी व्यक्ती आपल्यातून गेली की त्याचा शोक करत बसण्यापेक्षा ते जल्लोषात त्या व्यक्तीला निरोप देतात. त्यांच्यासाठी अंत्ययात्रा म्हणजे एक उत्सवच असतो.

मृत व्यक्तीची शवपेटी अनेकदा कुटुंबिय आकर्षक पद्धतीने तयार करून घेतात. त्यांचा पारंपरिक शवपेटीपेक्षा वेगवेगळ्या आकाराच्या शवपेट्या तयार करून घेण्यावर भर असतो. कुटुंबिय नातेवाईक इतर मित्रमंडळी अंत्ययात्रा निघताना मोठ्या संख्येने उपस्थित असतात. पण कोणाच्याही चेहऱ्यावर यावेळी दु:ख नसते, ना डोळ्यात अश्रू असतात. चेहऱ्यावर फक्त आनंद असतो. सगळेच पारंपरिक वाद्य आणि संगीत यांच्या तालावर ठेका धरत अंत्ययात्रेत डान्स करतात. खाणे पिणे, नाच-गाणे अशा जल्लोषात येथे अंत्ययात्रा काढली जाते.

यासंदर्भातील वृत्त ‘सीएनएन’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार लग्नापेक्षाही कैक पटींनी जास्त पैसे हे लोक अंत्ययात्रेवर खर्च करतात. वेडिंग प्लानर असा एक प्रकार आपल्याकडे प्रचलित आहे. पण घानामध्ये खास अंत्ययात्रा प्लान करणाऱ्या एजन्सी देखील आहेत. या एजन्सी वादक, गायकापासून डान्सरचा पुरवठा देखील करतात. यातील काही जण तर शवपेट्या खांद्यावर ठेवून संपूर्ण अंत्ययात्रेत न थकता नाचूही शकतात.

Leave a Comment