‘हे’ महाशय दररोज ऑफिसला विमानाने येतात!


सर्वसामान्यांना आपल्या कामावर जाताना रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सीने प्रवास करावा लागतो. काहीजणांकडे स्वत:ची गाडी देखील असते. कधीकधी हा प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी काहीजण एसी टॅक्सीनेही येतात. त्यात काहीवेळा ऑफिसच्या कामासाठी विमानाने येणे-जाणेही होते. पण अमेरिकेत एक माणूस असा आहे जो रोज ऑफिसला विमानाने ये-जा करतो. त्यांचे नाव कर्ट असे असून तो व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याची सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये स्वत:ची टेक कंपनी आहे.

लॉस एन्जलिसमध्ये तो राहतो. कर्टला सकाळी साडेआठ नऊच्या सुमारास ऑफिसला पोहोचायचे असते. पहाटे पाच वाजता तेव्हा त्याच्या दिवसाची सुरुवात होते. सकाळी उठून तयारी केल्यानंतर वीस मिनिटांचा प्रवास करून कर्ट विमानतळावर पोहोचतो, त्यानंतर काही मिनिटांत विमान सॅन फ्रॅन्सिस्कोला रवाना होते. ९० मिनिटे प्रवास करून साडेसातच्या सुमारास तो ऑकलंड एअरपोर्टवर पोहोचतो. तिथे कर्टने आपल्यासाठी आणखी एका गाडीची सोय केलेलीच आहे. तेव्हा तिथून पुन्हा अर्ध्या तासाचा प्रवास करून कर्ट एकदाचा ऑफिसला पोहोचतो. पहाटे पाच वाजता त्याचा जो प्रवास सुरू होतो तो रात्री ११ वाजता संपतो. आठवड्यातील पाच दिवस कर्ट विमानानेच ऑफिसला ये जा करतो.

Leave a Comment