पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खासदार धानोरकरांचे वादग्रस्त वक्तव्य


चंद्रपूर: अनेक नेते मंडळी सभेत उपस्थित जनतेकडून प्रतिसाद मिळवण्याच्या नादात बेताल वक्तव्य करून जातात. कधी कधी यात वादग्रस्त वक्तव्यांचा देखील समावेश असतो. असाच एक प्रताप चंद्रपूरातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनीही केला आहे. धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अत्यंत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे धानोरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करण्याचे टाळले. उलट त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले राहुल गांधी यांनी आपण जहरी टीकेचे प्रत्युत्तर प्रेमाने देऊ, कारण काँग्रेसची ही संस्कृती नसल्याचे जाहीर सभेत वारंवार सांगितले. याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत असलेले बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचे तिकीट मिळवले आणि निवडूनही आले. ते राज्यातून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. म्हणून त्यांची काँग्रेसच्या गोटात पतही वाढली आहे. पण, त्यांना काँग्रेसच्या संस्कृतीत मिसळायला अजून जमले नसल्याचे दिसत आहे. धानोरकर यांच्या भाषणातून हे समोर आले आहे.

काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानभरपाई संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले होते. धानोरकर यांचा यावेळी संबोधित करताना तोल सुटला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली. या भाषणाचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यामुळे धानोरकर यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment