भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनियांची भेट घेणार काँग्रेस आमदार


मुंबई – काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे काही तरुण आमदार आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. आमदार सुनील केदार, आमदार विश्वजीत कदम, आमदार सुनील केदार आदींनी यात पुढाकार घेतला असून यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जून खर्गे हेही दिल्लीला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तरुण आमदार यांची बैठक बुधवारी सायंकाळी वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर पार पडली. काँग्रेसच्या अनेक तरुण आमदारांनी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने तातडीने पावले उचलावीत आणि आवश्यकता पडल्यास शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी मागणी या बैठकीत लावून धरली होती. दरम्यान, राज्यातील काही तरुण आमदार मागणीसाठी तयार केलेले निवेदन घेऊन आज दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.

काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांच्यासह अनेक नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यातच माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी पक्ष योग्य भूमिका बजावेल असे वक्तव्य केल्यामुळे आज दिल्ली येथे होणाऱ्या या भेटीनंतर काँग्रेसची राज्यातील भूमिका स्पष्ट होईल असेही बोलले जात आहे.

Leave a Comment