शशिकलांची 1600 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त


नवी दिल्ली – तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची प्रदीर्घ काळ असलेली मैत्रीण व्ही. के. शशिकला यांची १६०० कोटी रुपयांची ‘बेनामी’ संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे.

सध्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याच्या प्रकरणात शशिकला बंगळुरूच्या तुरुंगात २०१७ पासून चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. आयकर विभागाच्या सूत्रांनुसार, नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीनंतर लगेचच अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला यांनी १५०० कोटी रुपये किमतीची चेन्नई, पुद्दुचेरी आणि कोइम्बतूरमध्ये ९ ‘बेनामी’ मालमत्ता ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांनी खरेदी केली होती.

बनावट नावाने या सर्व मालमत्ता खरेदी करण्यात आल्या होत्या आणि सर्व मालमत्ता ‘रोख’ रक्कम देऊन खरेदी करण्यात आल्या होत्या. या मालमत्तांची सध्याची किंमत १६०० कोटी रुपये सांगितली जाते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने २०१६ मध्ये लागू केलेल्या बेनामी खरेदी-विक्री (प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम २४ (३) नुसार ही कारवाई करण्यात आली.

२०१७ मध्ये आयकर विभागाने ऑपरेशन ‘क्लीन मनी’ अंतर्गत शशिकला आणि त्यांच्या नातेवाइकांवर छापे टाकले होते. त्याच वेळी जप्त केलेल्या मालमत्तांशी संबंधित दस्तऐवज जप्त करण्यात आले होते, असे समजते. असे सांगितले जाते की, आपल्या मालमत्तेच्या तपशिलात शशिकला यांनी कधीही या मालमत्तेची घोषणा केली नाही.

तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने डिसेंबर २०१६ मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकचे नेतृत्व सांभाळणाऱ्या शशिकलांची पक्षातून हकालपट्टी केली होती. जयललितांच्या मृत्यूसंबंधातही शशिकलांची चौकशी झाली आहे.

Leave a Comment