हँगओव्हर झाल्यास मिळणार अधिकृत सुट्टी


म्युनिख – तुम्ही कधी तुमच्या बॉसकडे आदल्या रात्री झालेल्या पार्टीमध्ये अधिक दारु ढोसल्यामुळे हँगओव्हर झाल्याचे कारण देत सुट्टी मागितली आहे का? पण अशी सुट्टी मागण्यासाठी हिंमत लागते आणि ती हिंमत सर्वांमध्येच असते असे नसल्यामुळेच हँगओव्हरमुळे अनेकदा डोके दुखत असतानाही आपल्यापैकी अनेकजण ऑफिसला जातात. पण जर तुम्ही जर्मनीत असाल तर हँगओव्हर झाल्यास तुम्हाला अधिकृत सुट्टी मिळू शकते. हे खरे आहे कारण हँगओव्हर हे ‘आजारपण’ असल्याचा निर्णय जर्मनीमधील एका न्यायालयाने दिला आहे.

यासंदर्भातील वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार दारुची नशा न उतरणे म्हणजे हँगओव्हर दुसऱ्या दिवशीही सकाळी कायम असणे हे आजारपण असल्याचा निर्णय जर्मनीमधील न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला हँगओव्हर उतरलेला नसताना ऑफिसला बोलावणे बेकायदेशीर असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

याबाबत स्थानिक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार एखाद्या खाद्यपदार्थावरील छापील माहिती त्या पदार्थाचे सेवन केल्यास आजारापासून एखाद्या व्यक्तीचा बचाव होईल, उपचार होईल किंवा उपचारांवर परिणाम होईल अशाप्रकारच्या कोणत्याही गुणधर्मांची ठोसपणे कबुली देऊ शकत नाही. तसेच त्या पदार्थाच्या गुणधर्मांमुळे आजारी पडल्याचे सांगता येत नसल्याचे मत नोंदवले आहे.

दरवर्षी जर्मनीमध्ये म्युनिक शहरात होणाऱ्या ओक्टोबीरफेस्ट नंतर हँगओव्हर आजार आहे की नाही याबद्दल वाद निर्माण झाला होता. मोठ्याप्रमाणात बियरचे सेवन दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्यामध्ये केले जाते. त्यामुळेच अनेकांनी दुसऱ्या दिवशी डोके दुखीचे कारण देत सुट्टी घेतली. हा वाद त्यावरुनच न्यायालयात गेला आणि न्यायालयाने तिथेही हँगओव्हर उतरला नसेल तर आजारपणाची सुट्टी घेण्यात काहीच गैर नसल्याचे मत नोंदवले. जर्मनीमधील न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाची सध्या जगभरात चर्चा होताना दिसत आहे.

Leave a Comment