फळ खावे की ज्यूस प्यावा ?


आजकाल फळांचा ज्यूस पिण्याचे वेड वाढत चालले आहे. एखादे फळ तसेच खाण्यापेक्षा रस पिणे सोपे असते म्हणून ज्यूस अधिक पसंत केला जायला लागला आहे. मात्र या संबंधातले तज्ज्ञ रस प्राशन करण्यापेक्षा फळ खाणे हे फायद्याचे असल्याचा निर्वाळा देतात. कारण रस प्राशन करताना तो गटागटा घशाखाली उतरवला जातो. किंबहुना फळ खात बसण्यापेक्षा रस पिण्यास कमी वेळ लागतो म्हणूनही रसाला पसंती दिली जाते. एखादे फळ खायला दहा पाच मिनिटे तरी लागतात पण त्याचाच रस काढला तर तो एका मिनिटात पोटात जातो. खरे तर याच कारणासाठी फळ जास्त गुणकारी ठरतेे. आपण काहीही खातो किंवा पीतो तेव्हा तो पदार्थ पोटात जाताना त्यात किती लाळ मिसळली जाते याला फार महत्त्व असते.

जितकी लाळ जास्त मिसळली जाते तितका तो पदार्थ पचायला सोपा जातो. फळ खाताना ते चावून खाल्ले जाते आणि चावताना त्यात लाळ मिसळली जाते. त्यामुळे फळ पचायला सोपे असते. त्याचाच रस पिताना मात्र त्याच्यात लाळ मिसळली जात नाही आणि पचायला अवघड जातो. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, फळ हे पौष्टिक असते पण त्याच्यातले पौष्टिक अन्न घटक काही केवळ रसात नसतात. काही फळांच्या सालीत तर काहींच्या गरात पोषण द्रव्ये असतात. आपण केवळ रस पीतो तेव्हा साल आणि गर फेकून देतो म्हणजे त्यांच्यातल्या पोषण द्रव्यांना वंचित होतो. याच घटकांत तंतुमय पदार्थही असतात. केवळ रस प्राशन केला तर तंतुमय पदार्थही आपल्याला मिळत नाहीत.

आयुर्वेद असे सांगते की, फळ खाताना त्यातली गोडी म्हणजे शुगरचे प्रमाण कमी असते पण आपण त्याचा रस काढतो तेव्हा त्यातले शुगरचे प्रमाण फळापेक्षा चौपटीने वाढलेले असते. असा हा रस आपण प्राशन करतो तेव्हा तो त्यातल्या साखरेच्या जादा प्रमाणाने पचायला अवघड होऊन बसतो. पण आपल्याला ज्यूसच प्यायची फार हौस असेल तर ब्रेक फास्टच्या वेळी तो प्यावा व तोही केवळ ४० मिली लीटर एवढाच घ्यावा. त्यात वरून अजून साखर मिसळली जाते ती मिसळू नये. उलट आहे त्या रसात थोडी मिरपूड टाकता आली तर पहावेे. त्यामुळे रस अधिक पाचक होतो. पण अशा काही काळज्या घेऊनच ज्यूस प्राशन केेला पाहिजे. बाजारातला तयार रस प्राशन करू नये कारण त्यात प्रिझर्व्हेटर आणि अन्य काही रसायने मिसळलेली असतात. ती आपल्या आरोग्याला घातक ठरत असतात. ज्यूस प्यायची भारी हौसच असेल तर तो आपण काढावा आणि ताजाच प्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment