गोमांस खाणाऱ्यांनी कुत्र्याचे मांस देखील खावे: भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य


कोलकाता – भाजपच्या वाचाळवीर नेत्यांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष आणि लोकसभा सदस्य दिलीप घोष यांनी बर्दवान येथील एका कार्यक्रमात बोलताना गोमांस खाणे गुन्हा असल्याचे सांगत जर गोमातेशी एखाद्याने गैरव्यवहार केला तर त्याला धडा शिकवा, असे म्हटले आहे. त्याच बरोबर त्यांनी रस्त्यावर काही बुद्धिजीवी गोमांस खातात. त्यांना मी सांगू इच्छितो की कुत्र्याचेही मांस त्यांनी खावे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहिल. कोणत्याही जनावराचे मांस त्यांना खायचे असेल खावे. पण रस्त्यावर नको, आपल्या घरी खावे, असा सल्ला दिला आहे.

घोष हे एवढ्यावरच न थांबता पुढे म्हणाले, गाय आमची माता आहे. गाईचे दूध आम्ही सेवन करुन जगतो. माझ्या आईशी जर कोणी दुर्व्यवहार केला तर त्याच्याबरोबर मी तशीच वागणूक करेन. गोहत्या आणि गोमांसचे सेवन करणे भारताच्या पवित्र भूमीत गुन्हा आहे. यापूर्वीही ऑगस्टमध्ये घोष यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना आणि पोलिसांना घाबरण्याची गरज नाही. राज्यातील विविध भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर नेहमी हल्ले होत आहेत. दोषींना पकडण्याऐवजी पोलिस बनावट प्रकरणे आमच्या मुलांवर दाखल करत आहेत. तुमच्यावर जर हल्ला होत असेल तर त्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना मारा, घाबरण्याची काहीच गरज नाही. काही अडचण आली तर आम्ही सांभाळून घेऊ. जर माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांना कारागृहात पाठवता येते तर तृणमूल काँग्रेसचे हे नेते आपल्यासाठी मच्छर, किड्यांसारखेच असल्याचे ते म्हणाले होते.

Leave a Comment