शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना जितेंद्र जोशीने झापले


आपल्यापैकी सर्वांनीच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राजकारणात आपल्या व्यक्तीमत्वाच्या जोरावर राजकीय समीकरणं बदलणारे शरद पवार यांची अमोघ अशी वक्तृत्व शैली अनुभवली आहे. शरद पवार यांचे लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान सातारा येथील भर पावसात केलेले भाषण प्रचंड गाजले. सोशल मीडियावर त्यांची एक क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. पण अनेकांनी त्याचवेळी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. या प्रकारावर अभिनेता जितेंद्र जोशी यांने आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आरे तुरे शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देणाऱ्या ट्रोलर्सला जितेंद्रने खडे बोल सुनावले आहेत. त्याने आपला संताप आपल्या ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात व्यक्त केला. अभिनेता सुबोध भावे आणि सुमीत राघवन यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. जितेंद्रने त्यांच्याशी संवाद साधताना शरद पवार यांना एकेरी बोलणाऱ्या ट्रोलर्सविषयी चीड व्यक्त केली.

निवडणुकी दरम्यान शरद पवार यांनी सातारा येथे सभा घेतली होती. त्यावेळी अचानक सुरू झालेल्या पावसात त्यांनी न थांबता आपले भाषण सुरू ठेवले. सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाची एक छोटी क्लिप तुफान व्हायरल झाली. राजकीय वर्तुळातही याची बरीच चर्चा झाली. त्यांच्या या भाषणाची प्रशंसाही झाली. पण काही ट्रोलर्सनी त्यांना अर्वाच्च भाषेत ट्रोलही केले

जितेंद्रने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओखाली असलेल्या अर्वाच्च भाषेतील प्रतिक्रिया पाहिल्यामुळे याबाबत त्याने संताप व्यक्त केला. ज्या व्यक्तीने अनेक वर्ष आपला काळ त्याक्षेत्रात घालवला आहे. त्यांच्याविषयी तरी आदराने बोला, असे म्हणत जितेंद्रने ट्रोलर्सला खडे बोल सुनावले.

Leave a Comment