दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चिदंबरम यांना मिळणार मिनरल वॉटर


नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची जामीन याचिका फेटाळली असून चिदंबरम यांचे कारागृह स्वच्छ ठेवण्यास आणि त्यांना डासांपासून सुरक्षा आणि मिनरल वॉटर देण्याचे निर्देश न्यायालयाने तिहार कारागृह अधीक्षकांना दिले आहेत.

प्रकृतीच्या कारणास्तव चिदंबरम यांनी जामीन मागितला होता. उच्च न्यायालयाने यासाठी गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संचालकांचे एका वैद्यकीय पथक गठित करुन चिदंबरम यांच्या आरोग्याची माहिती देण्यास सांगितले होते. काल हा अहवाल मंडळाने न्यायालयासमोर सादर केला. न्यायालयाने त्यावर निर्णय देत डॉक्टर तुरूंगात चिदंबरम यांची नियमित तपासणी करेल, असे सांगितले आहे.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी पी. चिदंबरम न्यायालयीन कोठडीत आहेत. २१ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खटला दाखल केला आहे. ‘फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा’मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Comment