फारुख इंजिनिअर यांना अनुष्का शर्माचे चोख प्रत्युत्तर


सध्या क्रिकेट आणि वाद ही गोष्ट अभिनेत्री अनुष्का शर्मासाठी काही नवीन राहिलेली नाही. तिचे नाव विराट कोहलीशी जोडल्या गेल्यापासून ते अगदी लग्न झाल्यावर सुद्धा बऱ्याच वेळी अनावश्यक कारणांसाठी तिचे नाव अनेक विवादांमध्ये गोवण्यात आलेले आहे. आता त्यात अजून एकाची भर पडली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांनी केलेल्या एका आरोपामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. पण आता त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अनुष्का शर्माने एक मोठे ट्विट केले आहे.

निवड समितीवर अनेक आरोप करताना या वर्षी इंग्लंड मध्ये झालेल्या वर्ल्ड कप दरम्यान ते फक्त अनुष्का शर्माला चहाचा कप आणून द्यायचं काम करत होते असे एक विधान फारूख इंजिनिअर यांनी केले होते. अनुष्का शर्माने त्याला उत्तर देताना केलेल्या ट्विटमधून प्रथमच आपली बाजू मांडली आहे. अनुष्का म्हणते, माझ्या नावावर खपणवण्यात येणाऱ्या अनेक खोट्या गोष्टींमधील ही नवी गोष्ट असून सर्व प्रथम मी या वर्ल्ड कपला फक्त एकच सामना पहायला गेले होते आणि त्यात सुद्धा मी खेळाडूंच्या फॅमिलीसाठी असणाऱ्या चमूत बसले होते, निवडकर्त्यांच्या नाही. पण जेव्हा सोय पाहिली जाते तेव्हा सत्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते.

अनुष्का निवड समितीच्या मुद्द्यांबाबत बोलताना म्हणते, तुम्हाला जर त्यांच्या पात्रतेविषयी काही शंका असतील आणि तुम्हाला त्यावर काही टिप्पणी करायची असेल तर जरूर तुम्ही करा पण तुमचे मत लोकांवर ठसवण्यासाठी आणि त्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी मलामध्ये घेऊ नका. मी कोणालाही हा अधिकार दिलेला नाही.

याआधीही अनुष्का शर्मावर बरेच आरोप करण्यात आले आहेत. बऱ्याच टूर्सवर ती कोहलीसोबत दिसते आणि सामन्यांना हजेरी सुद्धा लावते. कोहली जेव्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरतो तेव्हा अनुष्काला दोष देण्यात आला आहे. या ट्विटमध्ये अनुष्काने तिच्यावरती बोर्डावर तिकिटांसाठी दबाव आणत असल्याचा आरोपाचाही खरपूस समाचार घेतला आहे. ती म्हणते, याबाबत मी कधीच काही बोलले नाही. कारण तशी गरजच मला वाटली नव्हती. पण खरे तर माझ्या प्रवासापासून ते तिकिटांपर्यंतचा सर्व खर्च मी स्वतःच्या पैशातून करत असते. बोर्डाच्या नाही. सर्वांनी अनुष्काच्या या प्रत्युत्तराचे कौतुक केले आहे आणि तिला सिनेसृष्टीतूनही पाठिंबा मिळत आहे.

Leave a Comment