दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना आणि टीना मुनिम यांच्या ‘फिफ्टी-फिफ्टी’ या चित्रपटात एक गाणे आहे ‘प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी, क्या है इरादा फिफ्टी-फिफ्टी…’. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सध्या या गाण्यासारखीच झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील प्रेमात फिफ्टी-फिफ्टीचा वायदा झाला आहे, मात्र दोन्ही पक्षांचा वायदा काय आहे, हे कोणाला माहीत नाही. त्यामुळेच स्पष्ट बहुमत मिळूनही युतीची अनिश्चितता काही संपायचे नाव घेत नाही. दोघांच्याही मनात कोणता मनसुबा आहे, हे लोकांना कळायला तयार नाही.
क्या है इरादा फिफ्टी-फिफ्टी?
महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही भाजपशासित राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा असे वाटत होते, की महाराष्ट्रात भाजपला जराही समस्या येणार नाही आणि हरियाणात मात्र भाजपच्या नाकी नऊ येतील. मतदानानंतरच्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये तर भाजपला सिंहासनावर बसवण्यातही आले होते. हरियाणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत भाजपचा जयजयकार होईल, असा अंदाज अनेक एक्झिट पोलनी वर्तवला होता. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा बहुमत मिळेल, याचा अंदाज होता मात्र हे बहुमत जेमतेम असेल हा अंदाज कोणालाही सांगता आला नव्हता.
गंमत म्हणजे भाजपच्या दृष्टीने सध्याची स्थिती अँटी-क्लायमॅक्ससारखी झाली आहे, कारण जेथे भाजपला कसोशीचे प्रयत्न करावे लागतील असे वाटत होते त्या हरियाणात भाजपचे सरकार स्थापनही झाले आहे. हरियाणात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेला नसतानाही रविवारही मनोहरलाल खट्टर यांनी वाजतगाजत दुसऱ्यांदा शपथ घेतली. इकडे महाराष्ट्रात ज्यांच्या सिंहासनावर बसण्याची कोणाला सुतराम शंकाही नव्हती ते देवेंद्र फडणवीस अधांतरी झाले आहेत. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी तलवार उपसली आहे आणि अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट ते धरून बसले आहेत. त्यामध्ये भाजपचा गाडा रूतून बसला आहे.
भाजपची अडचण ही झाली आहे, की उद्धव ठाकरे हे मागे अमित शाह यांच्या सोबत झालेल्या समझोत्याचा हवाला देत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीआधीही शिवसेना अशीच अडून बसली होती आणि त्यावेळी उद्धव यांची समजूत काढण्यासाठी अमित शहा यांना स्वतः मुंबईला यावे लागले होते. ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन शहा यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केली होती. तोपर्यंत भाजपच्या वाटेत अडथळा बनून बसलेली शिवसेना एकदम पाघळली होती आणि लोकसभेसाठी कमी जागा लढविण्यासाठी होकारही देऊन बसली होती. उद्धव आणि अमित शहा यांच्यात त्यावेळी काय चर्चा झाली, हे माहीत नाही परंतु उद्धव यांच्या म्हणण्यानुसार, शहांनीच तेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टी सूत्र अंमलात आणण्याचा वायदा केला होता. म्हणजेच भाजप- शिवसेनेने विधानसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि बहुमत मिळाले तर दोन्ही पक्ष अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतील. या सूत्राची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे, असे उद्धव यांचे म्हणणे आहे परंतु भाजप ते मानायला तयार नाही. “भाजप आणि शिवसेनेत कुठलाही 50-50 फॉर्म्युला ठरलेला नाही. आगामी पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री राहणार,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुढील आठवड्यात शपथविधी अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
याचाच अर्थ आता भाजपने लेखी स्वरूपात अडीच-अडीच वर्षांची मुख्यमंत्रीपदाची हमी दिली तरच सरकार स्थापन होऊ शकेल, अशी स्थिती आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यापासून, किंबहुना त्याही पूर्वीपासून, फडणवीस हे पदावर पुन्हा आरूढ होण्यास सज्ज झाले आहेत. मात्र त्यांच्या या तयारीत शिवसेनेने खोडा घातला आहे. त्याला अर्थातच उत्तर देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपद अन्य कोणाला देण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी ठणकावले आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत फडणवीस यांच्या म्हणण्याने काहीही होणारे नाही. फडणवीस यांच्या म्हणण्याने उद्धव ऐकतील, अशीही परिस्थिती नाही. कारण त्यांनी थेट शहांची साक्ष काढली आहे आणि आजच्या घडीला शहांचा शब्द भाजपमध्ये अंतिम आहे. फडणवीसहे काही शहांच्या सूत्राला धाब्यावर बसवू शकत नाहीत. दुसरीकडे शहा यावर काही बोलायलाच तयार नाहीत. म्हणूनच हे त्रांगडे सुटण्याचे काही चिन्ह नाही. आता दिवाळी सरत आली आहे आणि बुधवारी भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड होईल. त्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग येईल. तोपर्यंत ही खडाखडी नुसतीच चालेल, असे दिसते.