आता समाजप्रबोधन करणार प्रथमेश परब


टाईमपास चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारा दगडू अर्थात प्रथमेश परब आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘उर्फी’, ‘टाइमपास २’, ‘लालबागची राणी’, ‘३५% काठावर पास’ अशा चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर लवकरच ‘टल्ली’ या चित्रपटामध्ये प्रथमेश झळकणार आहे.


नुकतेच या चित्रपटाचे टायटल पोस्टर रिलीज करण्यात आले असून इन्स्टाग्रामवर हे पोस्टर प्रथमेशने शेअर केले आहे. प्रथमेश झेब्रा एन्टरटेन्मेंटअंतर्गत निर्मिती करण्यात येणाऱ्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार आहे. आतापर्यंत विविधांगी भूमिका प्रथमेश परबने साकारल्या असल्यामुळे तो आगामी चित्रपटामध्ये कोणत्या रुपात दिसणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच चित्रपटाच्या नावावरुन या चित्रपटावरुन हा विनोदी आणि धम्माल करणारा चित्रपट असल्याचा एकंदरीत अंदाज बांधण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांनी माझ्या आजवरच्या विनोदी भूमिकांना आणि चित्रपटांना उत्तम प्रतिसाद दिला. टल्ली चित्रपट जरी विनोदी असला, तरीही विनोदाला या चित्रपटात समाज प्रबोधनाची झालर आहे. माझी या चित्रपटात पहिल्यांदाच ओळख करून देताना नावाअगोदर ‘in & as’ प्रथमेश परब असे दिसेल. अशी ओळख कोणत्याही अभिनेत्याच्या कारकिर्दीत होणे, ही मानाची गोष्ट असते. माझा लूकही या चित्रपटात वेगळा असणार आहे. लवकरच चित्रपटासाठी माझे फिजीकल ट्रेनिंगही सुरू होईल, असे प्रथमेशने म्हटले आहे.

Leave a Comment