अरविंद जगताप म्हणतात; पुन्हा शिवाजी महाराजांच्या नावे मत मागू नका,


मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ फेम पत्रलेखक आणि कवी अरविंद जगताप यांनी स्वतःच्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्ने तरी दाखवू नका, महाराजांच्या नावे मते मागू नका, अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून जगताप यांनी सर्व राजकीय पक्षांना धारेवर धरले आहे. स्वस्तातील साडीसाठी गुजरात ठीक आहे, पण नेतानिवडीसाठी नसल्याचा तिरकस निशाणाही त्यांनी साधला आहे.

अरविंद जगताप हे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात मार्मिक पत्र लिहून सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी ओळखले जातात. अरविंद जगताप यांनी आपल्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरुन राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेल्या राजकारणावर तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिवाजी महाराजांची कथा सांगणारी एक पोस्ट फेसबुकवर लिहून राजकीय नेत्यांवर अरविंद जगताप यांनी आसूड उगारला आहे. कोणा पटेल किंवा शहांची महाराष्ट्र वाट का पाहत आहे? असा जळजळीत सवाल जगतापांनी राजकारण्यांना केला आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत असून ती तुफान व्हायरलही झाली आहे.

गुजरातचे त्याकाळचे सत्ताधारी लोक एक मराठी राजा येईल म्हणून घाबरायचे. त्या मराठी राजांचे नाव होते शिवाजी महाराज. आता महाराष्ट्र कुणाची वाट पाहतो? कधी अहमद पटेल, कधी अमित शहा. आघाडी आणि यूतीत धमक नाही. स्वत:च्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्ने तरी नका दाखवू. पुन्हा कधीच महाराजांच्या नावाने मत मागू नका. स्वस्तातील साडीसाठी गुजरात ठीक आहे. पण नेतानिवडीसाठी नाही. 15 तासात अरविंद जगताप यांच्या पोस्टला साडेचार हजारापेक्षा जास्त रिअॅक्शन मिळाल्या आहेत. तर एक हजारपेक्षा जास्त यूझर्सनी ही पोस्ट शेअर केली आहे. तीनशेपेक्षा जास्त जणांनी कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत सहमती दर्शवली आहे.

Leave a Comment