बगदादी मेला पण…!


इसिस या आंतरराष्ट्राय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी अबु बकर अल बगदादी याला मारण्यात अखेर अमेरिकेी फौजांना यश आले आहे. अमेरिकेच्या सैनिकांनी बगदादीला सीरियात ठार केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. एका दहशतवादी अध्यायाचा अंत यामुळे झाला असला तरी बगदादी आणि इसिसच्या उदयामागील अमेरिकेची भूमिकाही त्या निमित्ताने येत्या काळात चर्चिली जाणार आहे.

सिरीयातील एका भुयारात झालेल्या आत्मघातकी स्फोटात बगदादी ठार झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. या स्फोटात त्याची तीन मुलेही ठार झाली, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. व्हाईट हाऊसमधून ट्रम्प यांनी बगदादी ठार झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. “अमेरिकी सुरक्षा दलांच्या श्वानांनी एका भुयारात दडून बसलेल्या बगदादीला शनिवारी रात्री शोधले आणि त्याच्यासोबत असलेल्या तिन्ही मुलांसह त्याला भुयाराच्या दुसऱ्या टोकाकडे पिटाळत नेले. भुयाराचे दुसरे टोक बंद असल्याने त्याने अंगावरील स्फोटकांच्या जॅकेटचा स्फोट घडवून आत्महत्या केली. त्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नव्हता. अनेकांना त्रास देणारा आणि अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला क्रूरकर्मा मारला गेला आहे. तो आता कधीच निष्पापांना, महिलांना आणि मुलांना त्रास देणार नाही. जग आता अधिक सुरक्षित झाले आहे,” असे ट्रम्प महणाले.

बगदादी आत्मघाती स्फोट घडवण्यापूर्वी रडत आणि किंचाळत होता. तो आजारी होता. त्याला नैराश्यानेही ग्रासले होते. पण आता तो नष्ट झाला आहे. तो हिंसक होता आणि त्याच मार्गाने त्याचा अंत झाला आहे. या कारवाईचे चित्रण लवकरच हाती येईल. तो नायक नव्हे तर भित्रा होता, असे ट्रम्प म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्याला अटक करणे किंवा ठार मारण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य होते, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

बगदादीचे खरे नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बद्री असल्याचे मानले जाते. त्याच्या नेतृत्वात इसिसने इराक व सीरियातील मोठ्या भूप्रदेशावर कब्जा केला होता. इसिसने या भागात कट्टरवादी इस्लामची क्रूर अंमलबजावणी केली आणि तेथे इस्लामिक कायद्यानुसार (शरिया) सरकारची स्थापना केली. हळूहळू अनेक देशांतील माथेफिरू तरुण इसिसकडे ओढल्या गेले आणि त्यात सामील झाले. जगातील अनेक उगवत्या दहशतवादी संघटनाही इसिसला सामील झाल्या आणि त्यांनी बगदादीचे नेतृत्व स्वीकार केले. यानंतर बगदादीच्या नेतृत्वात इसिसने इराक व सीरियाशिवाय जगातील अन्य अनेक भागांत दहशतवादी कारवाया पार पाडल्या आणि बगदादी संपूर्ण जगासाठी दहशतवादाचा चेहरा बनला.

म्हणूनच बगदादीचा मृत्यू या घटनेला एक प्रतीकात्मक अर्थ आहे. बगदादीचा मृत्यू हा विध्वंसक दहशतवादाच्या प्रतीकाचा शेवट आहे: गेली पाच-सहा वर्षे सीरियात इसिस नावाचे अमानुष साम्राज्य उभे करून सगळ्या जगाला वेठीस धरणाऱ्या बगदादीचा अंत झाला, ही स्वागताचीच गोष्ट आहे. मात्र त्यासोबत बगदादी व त्यांच्या या दहशतीच्या साम्राज्यामागे अमेरिकेचा हात असल्याचे वास्तवही अधोरेखित झाले आहे. अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला संपुष्टात आणल्यानंतरही असेच प्रश्न उद्भवले होते.

इसिस आणि अन्य दहशतवादी संघटनांचा प्रसार होण्याचे मुख्य कारण हे अमेरिकेचे वॉशिंग्टनचे धोरण आहे. इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वात 2003 मध्ये इराकवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर बगदादीने काही जणांसोबत मिळून एका छोट्या बंडखोर गटाची स्थापना केली. या गटाने अमेरिका व अन्य देशांच्या सैनिकांवर हल्ले करणे सुरू करणे. अमेरिकी सैनिकांनी 2004 मध्ये त्याला ताब्यातही घेतले होते आणि दक्षिण इराकमधील बक्का येथे छोट्या शिबिरात ठेवण्यात आले. मात्र त्याच्यापासून फारसा धोका नाही, असे समजून केवळ 10 महिन्यांत त्याला सोडण्यात आले. इथून सुटल्यावर तो अल-कायदाची इराकी शाखा असलेल्या एक्यूआईमध्ये सामील झाला आणि 2006 मध्ये एक्यूआई संघटना मुजाहिद शूरा काउंसिलशी जोडल्या गेली. त्याच वर्षी ही संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराकमध्ये रूपांतरित झाली आणि बगदादी तिची सल्लागार शूरा काउंसिलचा हिस्सा बनला. अमेरिका व मित्रदेशांनी इसिसच्या विरोधात युद्ध छेडले मात्र कित्येक वर्षे ते इसिसला आटोक्यात आणू शकले नाहीत. अखेर सुमारे पाच वर्षांच्या लढाईनंतर मार्च 2019 मध्ये सीरियातील इसिसच्या ताब्यातील शेवटचा भाग मुक्त करण्यात आला.

अल कायदा ही संघटना अमेरिकेने खतपाणी घातल्यामुळेच वाढली, हे जगजाहीर आहे. तसेच इराकवर हल्ला करून तेथील बंडखोरांना चिथावणी देण्याचे पापही अमेरिकेचेच. याचा अर्थ पश्चिम आशियात अशांतता निर्माण करण्यात सर्वात मोठा हात अमेरिकेचाच आहे. त्यामुळे बगदादी मेला, परंतु बगदादी इतके दिवस टिकला कसे आणि तो मुळात निर्माण का झाला, याचा जाब अमेरिकेला द्यावा लागेल.

Leave a Comment