यामुळे मला मतदारांनी नाकारले – वनिता राऊत


चंद्रपूर- गाव तेथे बिअरबार, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला सवलतीच्या दरात रेशन कार्डावर दारू, कायदेशीर मार्गाने दारू पिण्याचे अधिकार, इत्यादी आश्वासन मी चिमूर विधानसभा मतदारसंघात आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. पण बेकायदेशीर मार्गाने नागरीकांना दारू प्यायची असल्याने मतदारांनी मला नाकारल्याची प्रतिक्रिया मतदार संघातील एकमेव महिला उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.

१ मे २०१५ ला जिल्ह्यात दारूबंदी घोषित करण्यात आली. फक्त कायदेशीर दारू विक्रीला दारूबंदीने बंदी झाली. मात्र, अवैध दारू विक्रीला ऊत आले असल्यामुळे पोलीस प्रशासन आणि अबकारी विभाग घायकुतीला आले आहे. प्रत्येक गल्ली बोळात अवैध दारू विक्री सुरू करण्यात आल्याचे चित्र आहे. पण यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत दारूबंदी विरोधातील आपल्या आगळ्या वेगळ्या जाहीरनाम्यामुळे चिमूर मतदारसंघातील महिला उमेदवार वनिता राऊत प्रचंड गाजल्या.

त्या राज्य आणि देश पातळीवर गाव तेथे बीअर, सवलतीच्या दरात दारू, अशा घोषणांमुळे प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या. पण, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. वनिता यांनी पराभवाबाबत बोलत असताना सांगितले की, मतदारांनी मला २८६ एवढे अल्प मते देऊन नाकारले आहे. जाहीरनामा मतदारांनी समजूनसुद्धा आणि त्यांचे आर्थिक शोषण होत असतानाही त्यांना आपले हित न दिसल्यामुळे आपण यापुढे चिमूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करणार नाही.

चिमूर विधानसभा मतदार क्षेत्र व लोकसभा क्षेत्रात पुन्हा स्वतः किंवा पक्षाचा उमेदवार देणार नसल्याची भूमिका अखिल भारतीय मानवता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वनिता यांचे पती जितेंद्र राऊत यांनी देखील स्पष्ट केली आहे. या क्षेत्रातील कोणत्याही शहर किंवा गावात शाखा उघडणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, निवडणुकीनंतर या विषयाला विराम मिळाला असला, तरी अवैध दारू विक्रीवर उपाय काय ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहीला आहे.

Leave a Comment