अस्थिरतेकडून अस्थिरतेकडे महाराष्ट्राची वाटचाल?


महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमी अंतराने का होईना, परंतु भारतीय जनता पक्ष – शिवसेना युतीला बहुमत मिळाले. त्यामुळे सरकारची स्थापना सहज होईल आणि रस्त्यात कोणतेही खाचखळगे येणार नाहीत, असे सर्वसाधारण मत होते. मात्र राजकारण हा खेळच बेभरवशाचा! त्यामुळे सत्तेच्या या खेळाला नवे वळण लागले आणि राज्याची वाटचाल पुन्हा अस्थिरतेकडे, अनिश्चिततेकडे होत आहे.

महाराष्ट्रासोबतच निवडणूक झालेल्या हरियाणातील जनतेने त्रिशंकू कौल दिला होता. तिथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे तेथे सरकार स्थापनेत पेच निर्माण होईल, असे मानले जात होते. परंतु झाले उलटेच. तिथे भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करून समेट घडवून आणला आणि भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्रात मात्र भाजप-सेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यांना बहुमतापसाठी आवश्यक 144 पेक्षा जास्त जागाही मिळालया. परंतु भाजपच्या स्वतःच्या जागा कमी झाल्या आणि शिवसेनेला सौदेबाजी करण्याची संधी मिळाली. गेली चार वर्षे भाजपने ज्या पद्धतीने सेनेला वागवले त्याचा वचपा काढण्याची संधी सेनेला मिलाली.

त्याचमुळे एकीकडे हरियाणातील राजकीय पेच संपुष्टात आला तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील चित्र अस्पष्ट आहे. एकीकडे सेनेने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे, तर दुसरीकडे भाजप अडीच दिवसांसाठीही हे पद सोडण्यास तयार नाही. उडत-उडत आलेल्या बातम्यांनुसार तर भाजप एकवेळ विरोधी बाकांवर बसेल पण शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 मिळाल्या आहेत तर शिवसेनेला 56 जागा आल्या आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सरकार स्थापन करण्यासाठी अजून 40 जागांची गरज आहे. निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचीत आमदारांची तातडीची बैठक शनिवारी बोलावली होती. तब्बल एक तास त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्धव यांनी आपला इरादा जाहीर केला. मुख्यमंत्रीपदासाठी 50-50 चा फॉर्म्युला हवा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. इतकेच नाही तर सत्तास्थापनेसंदर्भात भाजपकडून लेखी हमी घ्यावी, यावरही शिवसेनेच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

आधीच सोशल मीडियामध्ये निकालाच्या दिवसापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सरकार असा प्रयोग होऊ शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्याला हवा देण्याचे काम सत्तार यांच्या वक्तव्याने केले. शिवसेनेपुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सत्तार यांनी ठणकावून सांगितले. अर्थात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही शक्यता नाकारली आहे. दोन्ही काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे.

भाजपच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष व सरकारवर एकहाती पकड बसवली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तेच महाराष्ट्रातील मुख्य नेते म्हणून समोर आले आहेत. विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यासारख्या तगड्या व त्यांना प्रतिस्पर्धी ठरू शकतील अशा नेत्यांना निवडणुकीच्या आधीच स्पर्धेतून बाद करण्यात आले. पंकजा मुंडे या यांचा निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे त्याही बाद झाल्या. त्यामुळे विधीमंडळ नेता निवडीच्या बैठकीत फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. परंतु निवडणुकीत भाजपला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे शिवसेनेला आता सत्तेत समान वाटा हवा आहे आणि त्यासाठी शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ भाजपवर आली आहे.

भाजप-सेना युतीची निश्चिती लोकसभा निवडणुकीपूर्वीच झाली होती. त्यावेळी उद्धव यांची अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी निश्चित झालेल्या सूत्रानुसारच विधानसभेतही युती केल्याचे उद्धव व फडणवीस या दोघांनीही वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र हे सूत्र कोणते याचा उलगडा आजतागायत झालेला नाही. योग्य वेळ येताच तुम्हाला हे सूत्र कळेल, असे सांगून फडणवीस यांनी या संदर्भातला प्रश्न टोलवला असेलही, मात्र जोपर्यंत हे सूत्र जाहीर होत नाही तोपर्यंत ही अनिश्चितता अशीच राहील. पुरेसे बहुमत नसल्यामुळे फडणवीस यांची पहिली कारकीर्द अस्थिरच राहिली, शिवसेनेची टीका भाजपला सतत सहन करावी लागली. आता ते बहुमत आणखी कमी झाल्यामुळे अस्थिरतेकडून अस्थिरतेकडे महाराष्ट्राची वाटचाल होत आहे की काय, अशी शंका निर्माण होत आहे.

Disclaimer: या लेखात मांडली गेलेली मते आणि दृष्टीकोन लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी माझा पेपर व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. तसेच वरील लेखाची कोणत्याही प्रकारची जवाबदारी माझा पेपर घेत नाही