धोनीच्या पुनरागमनाबाबत निवड समितीने घेतला कठोर निर्णय


मुंबई – गेले काही दिवस देशातील क्रिकेट प्रेमींच्या मनात महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात पुनरागमन कधी करणार हा प्रश्न आहे. भारताचे आव्हान २०१९ मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत संपुष्टात आले. धोनी या स्पर्धेत आपल्या संथ फलंदाजीमुळे टिकेचा धनी बनला होता. यानंतर धोनीने वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत विश्रांती घेणे पसंत केले होते. विंडीजविरुद्ध डिसेंबर महिन्यात घरच्या मैदानावर मालिकेत धोनी भारतीय संघात पुनरागमन करेल अशी चर्चा होती, पण या संदर्भात ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार आता धोनीला भारतीय संघात स्थान देण्याच्या मनस्थितीत निवड समिती नाही.

भारतीय संघात जागा धोनीला हवी असल्यास निवृत्तीच्या मालिकेत त्याला जागा दिली जाईल. त्याशिवाय आता भारतीय संघात धोनीला जागा मिळणे अशक्य असल्याचे निवड समितीतील सुत्रांनी सांगितले आहे. मध्यंतरीच्या काळात दोन महिने भारतीय लष्करात क्रिकेटपासून दूर राहिलेल्या धोनीने काम केले. त्याचबरोबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे झालेल्या कसोटी सामन्यातही धोनी मैदानात हजर होता.

निवड समितीने महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी ऋषभ पंतला स्थान दिले. पण ऋषभ पंतची फलंदाजीत कामगिरी अतिशय निराशाजनक झाल्याने, आगामी बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसनलाही संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतही पंतला विश्रांती देऊन साहाला संधी देण्यात आली होती. त्यामुळे आगामी काळात धोनी आपल्या निवृत्तीचा निर्णय कधी घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment