विधानसभेत यंदा दिसणार 24 महिला आमदार


मुंबई : यंदा 24 महिला आमदार 288 सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत दिसणार आहेत. एकूण 235 महिला उमेदवार यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यापैकी 24 महिला आमदारांचा विजय झाला आहे. 24 पैकी सर्वाधिक म्हणजे 12 भाजपच्या महिला आमदार आहेत. तर काँग्रेसच्या पाच आमदार निवडून आल्या आहेत. शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन महिला आमदार विधानसभेत दिसतील. याशिवाय दोन अपक्ष महिला आमदारही विधानसभेत आपापल्या मतदारसंघाचा आवाज बुलंद करतील.

राजकारणात 33 टक्के महिलांना आरक्षण आहे. 33 टक्के आरक्षणाचा 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत विचार केल्यास 95 महिला आमदार असणे अपेक्षित आहे. फक्त 20 महिला आमदार 2014 च्या निवडणुकीत निवडून होत्या. त्यामुळे 2014च्या तुलनेत यंदा त्यात चार महिला आमदारांची भर पडली असून हा आकडा 24 वर पोहोचला आहे. विधानसभेच्या आजवरच्या इतिहासात हा सर्वाधिक आकडा आहे.

तब्बल 13 महिला आमदार 1962 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. पण 2019 च्या निवडणुकीपर्यंत महिला आमदारांची संख्या 20 च्या पुढे जाऊ शकलेली नव्हती. यंदा 24 महिला आमदार निवडून आल्या असल्या तरी 33 टक्के आरक्षणाचा आकडा गाठण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

12 विद्यमान महिला आमदार यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजयी झाल्या आहेत. यापैकी आठ आमदार भाजपच्या तर तीन काँग्रेस आणि एक राष्ट्रवादीच्या आहेत. यात मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माधुरी मिसाळ, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि सुमनताई पाटील यांचा समावेश आहे.

सरोज अहिरे, अदिती तटकरे, लता सोनावणे, यामिनी जाधव, मुक्ता टिळक, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा, प्रतिभा धानोरकर, सुलभा खोडके, गीता जैन आणि मंजुळा गावित यांचा विधानसभेत पहिल्यांदाच निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये समावेश आहे.

Leave a Comment