महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागतच


पुणे – गुरूवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजप-शिवसेना युतीचे सरकार या निकालामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थापन होणार हे निश्चित असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चेने वेग घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नवे समीकरण जुळू पाहत आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या नव्या समीकरणावर भाष्य केले आहे. जर महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागतच असल्याचे मत कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

भाजपकडून स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा केला जात असताना १०७ जागांवरच त्यांचा विजयी रथ थांबल्यामुळे शिवसेनेशिवाय भाजपला पर्याय नसल्याची चर्चा सुरू झाली. सत्तेत भाजपा शिवसेना बसणार असे चित्र तयार होत असतानाच भाजपला सत्तेपासून रोखणे आपला प्राधान्यक्रम असल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केला. त्याचबरोबर नव्या आघाडीची मोट बांधण्याचे संकेतही दिले आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे असल्यास त्यांनी राष्ट्रवादीसोबत यावे, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगत नव्या समीकरणाच्या चर्चांना हवाच दिली आहे.

दरम्यान, नव्या समीकरणाचे स्वागत करू असे राष्ट्रवादीच्या विजयात महत्त्वाची भूमिका असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनीही म्हटले आहे. डॉ. कोल्हे निवडणूक निकालाविषयी बोलताना म्हणाले, भाजपकडून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यांना प्रचाराच्या काळात बगल देण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याकडून वारंवार कलम ३७० सारखे प्रश्न पुढे आणण्यात आले. ग्रामीण भागातील मतदार असंख्य समस्यांना तोंड देत असताना त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ग्रामीण महाराष्ट्राने भाजपला नाकारले. प्रचारासाठी आणखी अवधी मिळाला असता, तर शहरी महाराष्ट्रानेही युतीला नाकारले असल्याचे ते म्हणाले.

शरद पवार प्रचाराच्या काळात महाराष्ट्रभर फिरले. त्यांचा वावर हा प्रेरणा देणारा होता. विशेष म्हणजे शरद पवारांना तरुणांनी पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्रातून चांगला निकाल आला. आता शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे हे समीकरण चर्चेत आहे. पण, त्याविषयी पक्ष निर्णय घेईल. पक्षाने तसा निर्णय घेतला, तर स्वागतच करेल, असे कोल्हे म्हणाले.

Leave a Comment