स्वंयघोषित कल्की भगवानच्या आश्रमात सापडले 600 कोटींचे घबाड


चेन्नई/हैदराबाद : आयकर विभागाने स्वतःला कल्कि या देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या विजय कुमार नायडू आणि त्याच्या मुलाच्या आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकातील आश्रमांवर छापेमारी केली आहे. 600 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती त्यात उघड झाली आहे. दरम्यान एक व्हिडिओ या कल्की बाबाने प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, देश सोडून मी कुठेही गेलेलो नाही.

विजय कुमार नायडूशी संबधित एकूण 39 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. त्यापैकी आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील कल्कि आश्रमावरील झाडाझडतीत 65 कोटींची अघोषित संपत्ती सापडली आहे. त्यात 45 कोटींची रोकड आणि 20 कोटी रुपये इतके मूल्य असलेले अमेरिकन डॉलर तसेच इतर देशांमधील चलनाचा समावेश आहे.

आयकर विभागाच्या या धाडी 16 ऑक्टोबरपासून सुरु आहेत. दरम्यान, विजयकुमार नायडू, त्याचा मुलगा एन के व्ही कृष्णा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना आयकर विभागाने समन्स बजावले आहे, तसेच चौकशीसाठीदेखील बोलावले आहे. दरम्यान, नायडूने या छापेमारीनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने त्यामध्ये म्हटले आहे की, देश सोडून मी कुठेही गेलेलो नाही, मी देशातच आहे. तसेच माझ्या भक्तांना मी सांगू इच्छितो की माझी तब्येतही ठीक आहे. नायडू आयकर विभागाच्या धाडींनंतर देश सोडून पळून गेला असल्याची बातमी काही माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. नायडूने हा व्हिडीओ त्यास उत्तर देण्यासाठी पोस्ट केला आहे.

Leave a Comment