शरद पवार – खंबीर, झुंजार परंतु एकाकी


“ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर कुठल्यातरी लोकांच्या आदेशाचा वापर करून खटले दाखल केले जात आहेत. त्यांना सांगून ठेवतो या सर्व खटल्यांना हा बारामतीकर पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं ते करा,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी दिला. पवार यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यांची प्रचाराची शेवटची सभा बारामतीत पार पडली. यावेळी त्यांनी वरील भाष्य केले.

शरद पवार यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात झंझावाती सभा घेतल्या. त्यातही निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी सातारा येथे केलेल्या भाषणाने चर्चेने खूप खाद्य पुरवले. एरवी निरस झालेल्या निवडणुकीचे वातावरण या भाषणाने ढवळून काढले. कारण या सभेत पवार यांनी मुसळधार पावसाची पर्वा न करता उपस्थितांना संबोधित केले आणि आपण अजूनही खंबीर असल्याचे, सत्ताधाऱ्यांना आव्हान देत असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे ते खरोखर सर्वांना पुरून उतरतील याची खात्री पाठिराख्यांना वाटली नसती तरच नवल.

पवार यांची साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेवेळी जोरदार पाऊस आला. मात्र त्याची तमा न बाळगता पवार यांनी भाषण सुरुच ठेवले. त्यांच्या या कृतीने सभेला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळाले. वयाच्या 79 व्या वर्षीही त्यांनी दाखवलेली ही तडफ पाहून प्रतिस्पर्ध्यांनीही त्यांना दाद दिली.

या उर्जेसाठी आणि कार्यक्षमतेसाठीच पवार ओळखले जातात. या वयातही ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. एकीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने जवळजवळ सगळा विरोधी पक्ष संपवला असताना पवार हे एकहाती संघर्ष करत आहेत. शनिवारी विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक सभा घेण्याचा विक्रम केला. निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी 65 सभा घेतल्या, तर त्यापूर्वी महाजनादेश यात्रेदरम्यान त्यांनी सुमारे 160 सभा घेतल्याची माहिती भाजपने दिली. फडणवीस हे पन्नाशीच्या घरातले, तर पवार ऐंशीच्या घरातले. तरीही पवार यांच्या 60 सभा या काळात झाल्या. याचाच अर्थ फडणवीस यांच्या तोडीस तोड प्रचार त्यांनी केला. पवारांच्या तुलनेत सुप्रिया सुळे यांच्या 12 सभा, अजित पवारांच्या 35 सभा आणि 5 रोड शो झाले. काँग्रेसच्या वतीने खासदार राहुल गांधी यांच्या केवळ पाच सभांचे आयोजन करण्यात आले, तर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी दिसल्याही नाहीत.

या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की शरद पवारांनी अजून शस्त्रे खाली ठेवलेली नाहीत. भाजपचा सत्तेचा रेटा अगदी जोरात असतानाही पवारांनी विरोधी नेत्याची आपली भूमिका सोडलेली नाही. भाजपने त्यांच्या पक्षातील बहुतेक सर्व मोठ्या नेत्यांना फोडले आणि आपल्यात सामावून घेतले. काँग्रेस गलीतगात्र झालेली आहे आणि तिच्यात लढण्याची शक्ती राहिलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्ष राज्यातून नामशेष झाला. म्हणून तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्ष म्हणून मला निवडून द्या, अशी याचना मतदारांकडे केली. अशा अवस्थेत भाजपच्या विरोधात जर कोणी उभे टाकले असेल तर ते शरद पवार उभे ठाकलेले दिसतात. त्यासाठी त्यांचे कौतुक करायलाच हवे.

हे सगळे खरे असले तरी पवारांच्या संघर्षाला साथ देण्यासाठी त्यांच्याकडे कोणीही नाही, हीसुद्धा एक बाजू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठमोठे नेते वेगवेगळ्या घोटाळे आणि गैरव्यवहारांमध्ये अडकले आहेत. अनेक जण कज्जे खटल्यांमध्ये गुंतले आहेत. किंबहुना या खटल्यांची भीती दाखवूनच भाजपने त्यातल्या अनेकांना आपल्याकडे आणले आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची भीती दाखवून भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडल्याची कबुली अजित पवार यांनी दिली होती.

स्वतः अजित पवार यांची भूमिकासुद्धा संशयास्पद राहिली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या पवार घराण्यात कुरबूर असल्याची चर्चा निवडणूक काळात अगदी उघडपणे सुरू होती. शरद पवार यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस आली आणि त्यांनी स्वतः ईडीसमोर हजर होण्याची तयारी दाखवली. परंतु अजित पवार यांनी ऐन वेळेस राजीनामा देऊन त्यांची ती खेळी अयशस्वी केली. संपूर्ण प्रचारकाळात पवार काका-पुतणे एकदिलाने काम करताना दिसले नाहीत.

जी स्थिती अजित पवारांची तीच पक्षातील अन्य नेत्यांची. जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासारखे नेते केवळ भाजपमध्ये घेतले नाही म्हणून राष्ट्रवादीत राहिल्यासारखे वागले. धनंजय मुंडेंसारखे तगडे नेते स्वतःच्या मतदारसंघात अडकून पडले. त्यामुळे शरद पवार यांचा हा संघर्ष एकहातीच राहिला. पवार कितीही खंबीर आणि झुंजार नेते म्हणून समोर उभे टाकले तरी अखेर पक्षाच्या प्रचार मोहिमेत ते एकटेच दिसले, हे वास्तव नजरेआड करता येते नाही.

Leave a Comment