सलमानचा बॉडीगार्ड शेराचा शिवसेनेत प्रवेश


गेली २२ वर्षे बॉलीवूड दबंग हिरो सलमान खान याचे एखाद्या सावलीप्रमाणे रक्षण करणारा सलमानचा बॉडीगार्ड गुरमित सिंह उर्फ शेरा याने शुक्रवारी शिवसेनेचे सदस्यत्व घेतले. शुक्रवारी शेरा मातोश्रीवर आला आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच युवा नेते आदित्य ठाकरे याच्या उपस्थितीत त्याने शिवसेनेचे सदस्यत्व घेतले. आदित्य ठाकरे यांनी शेराच्या हातात शिवबंधन बांधले.

महाराष्ट्रात विधानसभेसाठी सोमवारी मतदान होत असून आज म्हणजे शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तरी अजूनही अनेक पक्षात लोकांची आवकजावक सुरु आहे. शेराचा शिवसेना प्रवेश त्यामुळेच कुतूहलाचा बनला असून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शेरा शिवसेनेच्या प्रचारात उतरणार काय याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. शेराच्या शिवसेना प्रवेशाची माहिती शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली गेली आहे.

गेली २२ वर्षे सलमानच्या सोबत असलेल्या शेराला सलमान घराच्या माणसाप्रमाणे मानतो. महाराष्ट्रात सोमवारी २८८ जागांसाठी मतदान होत असून त्यातील १२४ जागांवर शिवसेना तर १६४ जागांवर भाजप निवडणूक लढवीत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार आहेत.

Leave a Comment