२००० रुपयांच्या नोटेची छपाई आरबीआयने केली बंद


नवी दिल्ली – २००० रुपयांच्या नोटांची छपाई आरबीआयने बंद केली असून २००० रुपयांच्या एकाही नोटेची छपाई चालू आर्थिक वर्षांत झालेली नाही. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने आरटीआय अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आरबीआयने ही माहिती दिली.

२००० रुपयांची नोट २०१६ मध्ये नोटबंदीनंतर पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काळ्या पैशांवर लगाम लावण्यासाठी अचानक रद्द केल्यानंतर २००० ची नोट चलनात आली होती. यावर त्यावेळी टीकाही झाली होती. अधिक मूल्याच्या या नोटेमुळे काळ्या पैशाला चालना मिळेल, असे जाणकारांचे मत होते.

उत्तरादाखल आरबीआयने म्हटले की, २००० रुपयांच्या ३५४.२९ कोटी नोटा आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये छापण्यात आल्या होत्या. तर ११.१५ कोटी नोटांची छपाई २०१७-१८ मध्ये करण्यात आली. ही आकडेवारी २०१८-१९ मध्ये आणखी कमी होऊन ती ४.६६ कोटीपर्यंत आली. चालू आर्थिक वर्षांत तर एकही नोट छापण्यात आलेली नाही.

२००० रुपयांच्या नोटेचे चलन मागील आर्थिक वर्षादरम्यान खूप कमी झाले. २०१८-१९ मध्ये चलनात असलेल्या २००० रुपयांच्या नोटेच्या संख्येत ७.२ कोटींची तूट नोंदवण्यात आली. मागील वर्षी नव्या २००० च्या नोटांची संख्या ३३६ कोटींनी घटून ३२९ कोटी इतकी झाली. तर ५०० रुपयांच्या नोटेची संख्या आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या १५४६ कोटींच्या तुलनेत २०१८-१९ मध्ये वाढवून २१५१ कोटींपर्यंत नेण्यात आले.

Leave a Comment