ओडिशाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या यंत्राचे ‘नासा’ने केले कौतुक!


भुवनेश्वर : पृथ्वीसमोरील वनप्रदेश नष्ट होणे ही गंभीर समस्या बनली असून वनप्रदेश नष्ट होण्याचे मोठे कारण बेकायदा आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीबरोबरच, वणवा किंवा जंगलातील आग हेदेखील ठरत आहेत. मोठ्या प्रमाणात वनप्रदेश नुकत्याच अमेझॉनच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीत नष्ट झाला होता.

ओडिशामधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी हेच लक्षात घेऊन यासंदर्भात उपाय करण्याचे ठरवले. याच प्रयत्नात, असे उपकरण त्यांनी विकसित केले आहे, ज्याद्वारे जंगलात लागलेल्या आगीची माहिती क्षणार्धात वनविभागाला मिळू शकते. या उपकरणाचे त्यांनी ‘ज्युएल बेटेल’ (JUEL BETEL) असे नाव ठेवले आहे. ‘नासा’ने या उपकरणाचे कौतुक केले आहे, तर या दोघांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी वन विभागाने आमंत्रित केले आहे.

हे उपकरण इलेक्ट्रॉनिक उपकरणे विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या प्रत्युष आणि प्रमित या दोन विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. या उपकरणाचे वैशिष्ट म्हणजे, हे उपकरण दर वीस मिनिटांनी जंगलातील परिस्थितीची माहिती वनविभागाला पाठवत राहते. २०१८च्या ऑक्टोबरमध्ये याच्या संशोधनावर या दोघांनी काम सुरु केले होते, तर २०१९च्या जून महिन्यात हे उपकरण तयार झाले.

दरवर्षी नासा अंतराळ संशोधन संचलनालयामार्फत ‘आय-टेक सायकल’ स्पर्धा घेण्यात येते, जगभरातून नवनवीन उपकरणे ज्यामध्ये सादर केली जातात. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये यावर्षी २५ उपकरणे पोहोचली होती, ज्यामध्ये ‘ज्युएल बेटेल’चा समावेश होता. विशेष म्हणजे, संपूर्ण आशिया खंडातून हे एकमेव उपकरण उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते.

Leave a Comment