एकनाथ खडसे म्हणतात ; मी का पंतप्रधान होऊ शकत नाही?


जळगाव – सध्या युतीच्या प्रचारार्थ भाजप नेत्या तथा केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी महाराष्ट्र दौऱ्यावर असून मंगळवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारसभा आयोजित केली होती. माजी मंत्री एकनाथ खडसे हे देखील यावेळी सभेला उपस्थित होते. आपल्या भाषणात खडसे यांनी पंतप्रधान व्हायची इच्छा व्यक्त केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. या देशाचे गुजरातमधील एका छोट्याशा कुटुंबात जन्मलेले तसेच चहा विकणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर पंतप्रधान आपण का होऊ शकत नाही. आपणही पंतप्रधान होण्याची इच्छा का बाळगू नये, असे खडसे यावेळी म्हणाले.

दरम्यान, तत्पूर्वी आपल्या भाषणाला खडसेंनी हिंदीतून सुरुवात केली. स्मृती इराणी यांनी त्यावेळी त्यांना मराठीतून बोलण्याची विनंती केली. पण, खडसेंनी मला हिंदीतून भाषण करायला आवडते. मी हिंदी विसरू नये म्हणून कधी कधी हिंदीतून भाषण करतो. संसदेत यायची माझीही मनापासून इच्छा असल्याचे सांगत आपल्या मनातील भावना जाहीरपणे सांगून टाकली.

सर्व विरोधक एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू असून माझ्या कन्येला मुक्ताईनगर मतदारसंघात पराभूत करण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर सोडा, सेनेचा बंडखोर याठिकाणी रिंगणात आहे. एवढच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मला संपवण्यासाठी जळगावात येऊन गेले. पवार राष्ट्रीय नेते असताना त्यांनी अशी भूमिका घ्यावी? असे असेल तर त्यांना राष्ट्रीय नेते म्हणावे तरी कसे? पण एक गोष्ट आहे, पवारांमुळे माझी प्रतिष्ठा वाढल्याचेही खडसे म्हणाले.

Leave a Comment