मोदींच्या सभेसाठी एसपी कॉलेजच्या परिसरातील झाडांवर कुऱ्हाड


पुणे – येत्या गुरुवारी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पार पडणार आहे. नरेंद्र मोदींची ही सभा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पार पडणार आहे. ही सभा पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात पार पडणार असून त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान कॉलेजच्या परिसरातील झाडांवर यावेळी कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. सोमवारी रात्री परिसरातील अनेक मोठी झाडे कापण्यात आली आहेत. सभेत अडथळा ठरणारी सर्व झाडे कापण्यात आली असून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे.

एसपी कॉलेजच्या मैदानात व्यासपीठ उभारण्याचे काम सुरु आहे. यावेळी अडथळा ठरणारी जवळपास १५ ते १६ झाडे कापण्यात आली आहेत. दरम्यान आयोजकांनी सुरक्षेच्या कारणास्तव झाडे कापण्यात आल्याचे सांगितले आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असतील. यावेळी त्यांची पहिली सभा परळीत पार पडणार आहे. परळीतून भाजप उमेदवार पंकजा मुंडे निवडणूक लढत आहेत. यानंतर साताऱ्यात नरेंद्र मोदी जाणार आहे. साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक होणार असून भाजपकडून उदयनराजे लढत आहेत. तर शिवेंद्रराजे यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत.

यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नरेंद्र मोदींची पुण्यात सभा पार पडणार आहेत. ही सभा एसपी कॉलेजच्या मैदानात पार पडणार आहे. नरेंद्र मोदी या सभेनंतर पुन्हा दिल्लीला रवाना होतील. शुक्रवारी १८ तारखेला मुंबईत सभा घेत नरेंद्र मोदींच्या प्रचाराची सांगता करतील.

Leave a Comment