निरुपम यांनी देवरांचा ‘निकम्मा’ असा केला उल्लेख


मुंबई – मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राहुल गांधींच्या रविवारी मुंबईत झालेल्या सभेला मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा हे गैरहजर राहिल्याने त्यांना लक्ष्य करत संजय निरुपम यांनी निकम्मा म्हटल्यामुळे काँग्रेसमधील त्यांची लाथाळी येत्या काळात सुरू राहणार असल्याचे दिसून येते.

सोमवारी पुन्हा आपल्याच पक्षातील नेत्यावर मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विटवरून हल्ला केला. पक्षातील प्रतिस्पर्धी व माजी खासदार मिलिंद देवरा यांना जोरदार लक्ष्य केले. राहुल गांधी यांच्या दोन सभा मुंबईत झाल्या. मिलींद देवरा हे या सभांना गैरहजर असल्यामुळे हा मुंबईत मोठा चर्चेचा विषय झाला आहे. तसेच मुंबई काँग्रेसमधील धूसफुस संपली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.


राहुल यांच्या सभांना गैरहजर असल्याबाबत निरुपम यांनी ट्विटरवर खुलासा केला. त्यात त्यांनी माझ्या घरी कौटुंबिक समारंभ होता. त्यात मी दिवसभर व्यस्त असल्यामुळे राहुल यांच्या सभांना मी उपस्थित राहु शकलो नाही. तो नेता माझा आहे, तो मला कायम सारखा असेल, असे त्यांनी राहुल यांच्या सदंर्भात म्हटले आहे.

पण, निरुपम यांनी त्याच ट्विटमध्ये ‘तो निकम्मा कुठे होता?’ असा सवाल केला आहे. अर्थात ‘निकम्मा’ म्हणजे मुंबईचे माजी अध्यक्ष मिलींद देवरा हे होते. कारण ऐन लोकसभा निवडणुकीत निरुपम यांना देवरा यांच्यामुळे मुबई अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना याविषयी विचारणा केली असता, कौटुंबिक कार्यामुळे निरुपम राहुल यांच्या सभांना येऊ शकले नाहीत. मला त्यांनी तसे कळवले होते. पण निकम्मा कोण याविषयी गायकवाड म्हणाले निरुपम यांचे ते ट्विट मी वाचलेले नाही. यावर काहीही अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.

Leave a Comment