पवारांचे हातवारे – वैफल्य की रणनीती?


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शीमध्ये केलेल्या हातवाऱ्यांची अपेक्षेनुसार तुफान चर्चा सुरू आहे. बार्शीतील राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी बार्शीत सभा घेतली. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून काही हातवारे केले. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे चर्चेला कारण ठरणारे होतेच आणि तसे ते झालेच. आता प्रश्न असा निर्माण झाला, की पवार यांनी केलेले हे हातवारे वैफल्याचे निदर्शक आहेत का रणनीतीचा भाग आहेत?

शरद पवारांचे निकटवर्तीय आणि बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसला निरोप देऊन शिवसेनेशी घरोबा केला. आता ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे बार्शीतील सभेत शरद पवार हे सोपलांचा कसा समाचार घेणार, याकडे बार्शीकरांचे लक्ष लागले होते. शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बार्शी येथे सभा झाली.

त्यावेळी भाषणाच्या सुरुवातीपासूनच पवार यांनी शिवसेना-भाजपवर टीकेची झोड उठवली. खासकरून मुख्यमंत्री फडणवीस यांना पवारांनी लक्ष्य केले. ‘विरोधक थकले आहेत. आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही,’ असे वक्तव्य फडणवीस यांनी एका सभेत केले होते. त्याचा संदर्भ घेत पवार म्हणाले, ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही.’ हे वाक्य बोलताना पवार यांनी काही वेळातच ते सर्वत्र व्हायरल झाले आणि चर्चेला उधाण आले. वृत्तवाहिन्यांनीही त्याला ठळक प्रसिद्धी दिली.

पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळु सरकलेली दिसत आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिली.

विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागल्याची चर्चा होती. गेल्या सुमारे एक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फाटाफुटीने ग्रस्त आहे. त्यातच त्यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडखोरीची लक्षणे दाखवायला सुरूवात केली आहे. या परिस्थितीत आपला पक्ष वाचवण्यासाठी पवार जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांत दिसत आहे. अगदी साध्या बूथपातळीच्या सामान्य कार्यकर्त्यालाही फोन करुन ते मदत मागत आहेत.

या संदर्भात एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता शरद पवार यांचा राग अनावर होण्याची घटना आज घडून आज फार दिवस झालेले नाहीत. अगदी गेल्या महिन्यातीलच ती घटना आहे. तुमचे नातेवाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जात आहेत, असे पवारांना विचारले असता त्यांचा संताप अनावर झाला. यावेळी संबंधीत पत्रकाराला माफी मागण्याची सूचना करत पवारांनी पत्रपरिषद सोडून जाण्याचा इशारा दिला. तेव्हापासूनच पवारांना वैफल्य आल्याची आणि त्यांचा तोल गेल्याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेला बार्शीतील या घटनेमुळे बळ मिळाले आहे.

खरोखरच पवार यांचा तोल गेला आहे का, त्यांना वैफल्य आले आहे का, हा प्रश्न आता पुन्हा डोके वर काढणार. त्याचसोबत ही पवार यांची रणनीती आहे का, असाही प्रश्न विचारायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात काँग्रेसशी युती करून निवडणूक लढवत आहे. परंतु काँग्रेसनेते आज नेत्यांची वानवा आहे. भाजपकडे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस अशी नेत्यांची फौज आहे, वक्त्यांची फळी आहे. त्या तुलनेत काँग्रेसच्या खात्यात शून्य जमा आहे आणि राष्ट्रवादीकडे शरद पवार व अजित पवार हेच दोन खंदे नेते होत. त्यातही अजितदादांनी छुपा असहकार अंगीकारला आहे. मग प्रचाराची सारी धुरा शरद पवारांनाच वाहावी लागणार आहे आणि त्यासाठी चर्चेचा सगळा केंद्रबिंदू आपल्यावर ठेवणे पवारांना भाग आहे. त्यासाठी फक्त विरोधकांवर टीका करून चालत नाही. त्यासाठी काही क्लृप्त्या कराव्या लागतात आणि तेच पवारांनी केले आहे, असे म्हणायला जागा आहे. पवारांचे ईप्सित साध्य झाले आहे. फोकस त्यांच्यावर वळला आहे आणि येते काही दिवस तरी ते चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील.

Leave a Comment