नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधणार मुस्लिम महिला


मुझ्झफरनगर: सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सत्तेत येताच एका मागोमाग एक अनेक प्रलंबित ठरावांना मार्गी लावण्याची सुरुवात केली आहे. ट्रीपल तलाक यातीलच एक उदाहरण आहे. मुस्लिम महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महत्वाच्या अशा या ठरावाला मान्यता मिळताच मोदी सरकारचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मुझ्झफरनगर येथे मुस्लिम महिलांनी आता मोदींचे आभार मानण्यासाठी चक्क नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्याचे ठरवले आहे. हा विचार रुबी गजनी यांच्या पुढाकाराने मांडण्यात आला असून मुस्लिम महिला यासाठी आपल्याकडील साठवून ठेवलेल्या पैशातून खर्च करणार आहेत.

यासंदर्भातील वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मोदींचे मंदिर कृष्णापुरी या प्रदेशात उभारण्यात येणार आहे. मंदिरा बाबत प्रतिक्रिया देताना रुबी गझनी यांनी मोदींनी मुस्लिम महिलांसाठी खूप मोठे पाऊल उचलले असल्याचे म्हणत मोदींचे आभार मानले. ट्रीपल तलाकच्या निर्णयानंतर मुस्लिम महिलांच्या आयुष्यात त्यांनी खूप बदल घडवून आणले आहेत, घरोघरी गॅस पोहचवण्यापासून ते सुरक्षेपर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध करून देत आहेत, यापेक्षा जास्त कोणी कशाची अपेक्षा करावी तसेच जगभरात विविध अवॉर्ड्सने मोदींना गौरवले जाते, नक्कीच ते काहीतरी चांगले काम करत असल्यामुळेच त्यांना हे सर्व सन्मान मिळत आहेत, यानुसार त्यांची पूजा जरी केली तरी त्यात गैर ठरणार नाही असेही रुबी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सध्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मंदिराच्या उभारणीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, मंदिराचे काम याला मान्यता मिळताच सुरु होणार आहे. या सर्व प्रकरणात प्रतिक्रिया देताना आम्ही सर्व मोदींच्या बाजूने असल्यामुळे कोणीही त्यांना मुस्लिम विरोधी म्हणून टॅग लावण्याची गरज नाही असे सुद्धा या मुस्लिम महिलांनी सांगितले आहे.

Leave a Comment