विधानसभा निवडणुकीत भाजपने खर्च केली विरोधकांपेक्षा चौपट रक्कम


महाराष्ट्र आणि हरियाणात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असून अवघ्या काही दिवसातच मतदान पार पडणार आहे. ज्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष आपला उमेदवार निवडूण आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत. निवडणूक प्रचारात मतदारांपर्यंत पोहोचण्यात कोणतीही कसर राहू नये यासाठी हे पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रयत्न करत आहेत. हे सर्व राजकीय पक्ष त्यासाठी तूफान पैसा खर्च करताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारासाठी खर्च करत असले तरी, या सर्वात भारतीय जनता पक्ष अव्वल असल्याचे पुढे आले आहे. नुकताच आपला एक अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने प्रसिद्ध केला. या अहवालानुसार भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांच्या तूलनेत तब्बल चौपट रक्कम खर्च केली आहे.

हा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स संस्थेने प्रसिद्ध केला असाल तरी हा अहवाल, विधानसभा निवडणूक 2019 मध्ये करण्यात आलेल्या खर्चासंबंधी नाही. तर, सन 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांतील खर्चाबाबतचा आहे. भाजपने इतर सर्व विरोधी पक्षांच्या निवडणूक खर्चाच्या चौपट रक्कम खर्च केल्याचे या अहवालातच पुढे आले आहे.

एडीआरच्या अहवालानुसार, 2014 मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी मिळून तब्बल 280 कोटी रुपये निवडणूक प्रचारावर खर्च केले होते. निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांना एकूण किती निधी मिळाला. त्यातला किती निधी पक्षांनी निवडणुकीवर खर्च केला याबाबतचा तपशीलही या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुक कालावधीत तब्बल 464.55 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम केवळ 15 पक्षांनाच मिळाली होती. या रकमेपैकी सर्व राजकीय पक्षांची मिळून 357.21 कोटी रुपये रक्कम खर्च झाली.

भारतीय जनता पक्षाला 296.74 कोटी रुपये, काँग्रेस पक्षाला 84.37 कोटी रुपये निधी मिळाला. 2014 मध्ये भाजपने 217.68 कोटी रुपये, तर काँग्रेस ने 55.27 कोटी रुपये खर्च केले. शिवसेना पक्ष 17.94 कोटी रुपये तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 कोटी रुपये निवडणुकीत खर्च केले. आता 2019 मध्ये पुन्हा एकदा निवडणूक सुरु आहे. विधानसभा निवडणूक 2019 साठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळतो आणि त्यातला हे पक्ष किती खर्च करतात याबाबत उत्सुकता आहे. तसेच, जनता कोणाच्या पारड्यात वजन टाकते याबाबतही उत्सुकता आहे.

Leave a Comment