एवढ्या संपत्तीचे मालक आहेत अभिजित बिचकुले


मुंबई – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी घेतला आहे. त्यांनी ४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. बिचुकले यांनी दाखल केलेल्या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. केवळ ७८ हजार ५०३ रुपये इतकी बिचुकले यांनी आपली एकूण संपत्ती असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे बिचुकलेंपेक्षा चौपटीहून अधिक संपत्ती त्यांची पत्नी अलंकृता यांच्या नावावर असल्याचे दिसत आहे. ३ लाख ६६ हजार ८१८ रुपये अलंकृता यांच्या नावावर असल्याचे बिचुकलेंनी स्पष्ट केले आहे.

आपल्याकडे दागिने, गाडी, पॉलिसी असे काहीही नसल्याचे वरळीतून अपक्ष निवडणूक लढवणारे बिचुकले यांनी म्हटले आहे. ७५ हजारांची रोख रक्कम आपल्याकडे असून याशिवाय तीन बँकांमध्ये ३ हजार ५०३ रुपये असल्याचे बिचुकलेंनी म्हटल्यामुळे आपली एकूण संपत्ती ७८ हजार ५०३ एवढी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पत्नी अलंकृता यांच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम, बँक खात्यांमधील रक्कम, पॉलिसी, दुचाकी, सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण ३ लाख २६ हजार ८१८ रुपयांची मालमत्ता असल्याचे या प्रतिज्ञापत्रात बिचुकलेंनी स्पष्ट केले आहे. अलंकृता यांच्या नावावर ८० हजारांची दुचाकी आणि ९० हजार किंमतीचे तीन तोळे सोने आहे.

एकही स्थावर मालमत्ता बिचुकले दांपत्याच्या नावावर नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मागील पाच वर्षांमध्ये एकदाही अभिजित बिचुकले यांनी आयकर भरलेला नाही. तर पत्नी अलंकृताने २०१५-१६ मध्ये ४६ हजार ९९४ रुपयांचा आयकर भरला आहे. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ९० हजार रुपये, २०१७-१८ मध्ये ७५ हजार रुपये, २०१८-१९ मध्ये एक लाख ५ हजार ५९५ रुपये तर २०१९-२० मध्ये ६९ हजार ३६० रुपये आयकर अलंकृता यांनी भरला आहे. याशिवाय साताऱ्यामध्ये आपल्याविरोधात एक खटला सुरु असल्याचेही बिचुकलेंनी या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

Leave a Comment